हॉटेलींग.... एक विचार करण्याचा मुद्दा.

हॉटेलींग.... एक विचार करण्याचा मुद्दा.

हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे.

मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते. मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. १-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते. तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन ’पाणी साधे का बिसलेरी’ असे विचारतो. दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो.

मग बराच वेळ ताटकळत ठेऊन, ८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", शितपेये ई. गोष्टी येतात. या सर्व गोष्टी आल्यावर, हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही, पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो. सहाजिकच स्टार्टर्स ची क्वांटीटी कमी असल्याने, जेमेतेमे एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो...पण आम्ही एकदम मस्त मुडमधे !

मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटर कडे आपण आशाळभुतासारखे पाहून थोडासा अवधी मागुन घेतो. कोणी व्हेज, कोणी नॉन व्हेज असे ठरत ठरत आपण शेवटी, वेटर नी ’सजेस्ट’ केलेले पदार्थ ऑर्डर करतो. त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेश मधे राहीलेले स्टार्टर्स चे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस ई. पदार्थांचे सेवन, सो कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते. तो पर्यंत आजुबाजुला असलेल्या एखाद्या ग्रुप मधे जोरदार हाश्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो. त्यातच एखादे अगम्य "म्युझीक" ’बॅग्राउंडला’ लावलेले असते. थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतय, पण ए.सी. तर चालू असतो. मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला’ सांगतो, तो ’वाढवल्यासारखे’ करून निघून जातो, थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही. 

मग खूपच गर्दी आहेना, ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्स च्या वाटणीच्या मागे लागतो.

काही चांगल्या, काही अपेक्षाभंगीत, काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मुड मधे जेवण सुरू करतो. मग सुरूवातीला काही विनोद, मग एस.एम.एस, मग ’नेबर्स’ बद्द्ल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्कींग प्रॉब्लेम... इ इ इ विषय ’डिस्कस’ करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणी वातट रोटी अजून शिल्लक आहे. मग ती रोटी कशीबशी संपवून न-वाफाळणारा ’स्टीम राईस’ समोर येतो. आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल’ सांगीतली जाते जी डाल, राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा कींवा दह्या बरोबर ढकलला जातो.

लगेच फिंगर ’बोल’ ची आज्ञा सुटते आणी नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बोल येतात. कसे तरी बुचकळून हात ’साफ’ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो कॉल्ड ’डेझर्ट’ आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.

एका पापडाचे १० -१५ रू; एका रोटीचे १५-२० रू; एका सुपचे ७५-८० रू; एका भाजीचे २०० -३०० रु; नॉन व्हेज डीश चे प्रत्येकि २५०-४०० रू: व जर मत्स्याहार केला असेल तर तर एका डीश चे ५००-८०० रू; असे एकुण २००० ते ५००० रू. (किती जण आहेत त्यावर अवलंबून)  बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो. मग त्या बिलाचा राग म्हणा कींवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा, पण आपण सुगंधीत बडीशोप, चवळ्या मटक्या व टूथपिक, भरभरून घेतो. बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्या सारखा, आपण १०-२० रू. टिप ठेवतो आणि बाहेर पडतो. मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत’ करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.

जरा विचार करा की आपण खालेल्या पदार्थांचे मुल्यांकन पटण्यासारखे असते ? कितपत स्वादिष्ट व आरामदायक होते ते जेवण ? किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ? हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी, जेमेतेमे २०-२५ मिनीटांच्या गप्पा, आणी निम्याहुन अधिक खिसा रिकामा.

अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठीकाणी नसेल सुध्दा पण बहुसंख्य ठीकाणी आहेच. त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरतो ? का नेहमी स्वत:चीच समजुत घालत बसतो ? 

आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे पण म्हणून असे पैसे उडवायचे
त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ करून आणून घराच्या हॉल मधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा ?

तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितितरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर जेमतेम निम्मा होतो. बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते.

"रिलॅक्सेशन" हे कारण असते हॉटेलिंग करण्यामागे, पण मलातरी वाटत नाही की प्रत्येक वेळेस ते साध्य होते

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained