*"काॅपीराईट" - महत्त्वाचा बौद्धिक संपदा हक्क* - Important information on Copyrights
*"काॅपीराईट" - महत्त्वाचा बौद्धिक संपदा हक्क*
आज फेसबुक, वॉटस् अॅप, इन्स्टाग्राम इ. विविध समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. या समाज माध्यमातून अनेक लोक त्यांचे लेख, कविता, गझल्स, फोटो इ. कलाकृती पोस्ट करत असतात. आणि या माध्यमाच्या वेगाची गती पाहता त्या कलाकृती वाऱ्याच्या वेगाने जगभर पसरत असतात. हा प्रसार होत असताना ती कलाकृती मूळ निर्मात्याच्या नावाने पुढे जाईल असे होत नाही. तर तंत्रज्ञानातील कॉपी, पेस्ट, फॉरवर्ड, शेयर इ. विविध तंत्रांमुळे मूळ लेखक, कवी व कलाकार याच्या नावाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावानेही पुढे पाठवली जाते. थोडक्यात ते साहित्य ढापले जाते, चोरले जाते आणि स्वतःच्या वा इतरांच्या नावाने पाठवून त्याचे श्रेय घेतले जाते, वाह वाह, कौतुक मिळवले जाते.
अनेकदा तर या समाज माध्यमातून ढापलेल्या, चोरलेल्या कविता वा लेख, फोटो इ. वर्तमानपत्रातून तसेच फेसबुक व वॉटस् अॅप वर स्वतःच्या वा खोडसाळपणा करण्यासाठी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने पुढे पाठविल्या जातात. या प्रकाराला आळा घालणे अशक्य असले तरी आपण सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कॉपीराईट कायद्यासंबंधित थोडक्यात माहिती इथे देत आहे.
*कॉपीराईट म्हणजे काय?*
- कोणत्याही व्यक्तीच्या साहित्य, नाट्य, संगीत, सिनेमा आणि कलात्मक कलाकृती या बौद्धिक संपदेबाबत कायद्याने देण्यात आलेले आणि संरक्षित केलेले अधिकार म्हणजे कॉपीराईट होय.
*कॉपीराईट कशाकशावर मिळतो?*
- साहित्य, नाट्य, संगीत आणि कला यांचेशी संबधित कोणत्याही कलाकृतीस कॉपीराईट मिळतो.
यात कथा, कादंबरी, कोणत्याही प्रकारचे ललित साहित्यिक लेखन, संशोधनात्मक तसेच अभ्यासात्मक लेखन, लेख, कविता, गाणी, गझल, संगीत, नाट्य, नाटक तसेच चित्र, छायाचित्र (फोटो), चलतचित्र, पेंटिंग, क्राफ्ट इ. विविध कालाकृतींचा यात समावेश होतो.
*कॉपीराईट कोणाला मिळतो?*
सदर कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यास त्या कलाकृतीचा काॅपीराईट मिळतो. ज्याच्या बुद्धीमत्तेतून, कल्पकतेतून कलाकृती निर्माण झाली आहे अशा प्रत्येक कलाकारास त्या त्या कलाकृतीचा कॉपीराईट मिळतो.
*भारतात कॉपीराईट संबधी कोणता कायदा आहे?*
*कॉपीराईट हक्काचे वैशिष्ट्ये –*
- कलाकृतीच्या निर्मात्यास त्याच्या बौद्धिक संपदेची काॅपीराईट नोंदणी करणे बंधनकारक नाही.
- कॉपीराईट हक्कासाठी पेटेंट, ट्रेड मार्क इ. इतर बौद्धिक संपदा कायद्यासारखे बौद्धिक संपदा हक्क मिळविण्यासाठी संबधित नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करून नोंदणी करावी लागत नाही.
- थोडक्यात *कॉपीराईट* हक्क हा *नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक नाही.*
- *कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्तीस/कलाकारास त्या* *कलाकृतीची निर्मिती केल्या केल्या न मागता तिच्यावर कॉपीराईट हक्क प्राप्त होतो. आणि या हक्काबरोबरच त्या कलाकृती संबंधात सर्व आर्थिक आणि नैतिक हक्क प्राप्त होतात.*
- © हे कॉपीराईट चे चिन्ह आहे. पुस्तक, लेख, कविता व कोणत्याही कलाकृतीवर © हे चिन्ह व नंतर त्या लेखक वा कलाकाराचे नाव लिहिलेलं असते. तेव्हा ती कलाकृती कोणाच्या मालकी हक्काची आहे ते हे चिन्ह सांगते.
- © हे चिन्ह लिहिण्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नसते. © हे चिन्ह व त्यापुढे नाव लिहिले म्हणजे त्यावर संबधित व्यक्तीचा हक्क आहे असे गृहीत धरले जाते.
- असे असले तरी *कॉपीराईट रजिस्ट्रीकडे नोंदणी केल्यास आपल्याला त्या नोंदणीचा निश्चितच फायदा होतो. म्हणजे भविष्यात कोणी आपल्या साहित्याची चोरी केली तर नोंदणीकृत कॉपीराईट हा कोर्ट केसेसमध्ये महत्त्वाचा पुरावा ठरतो. रजिस्ट्रीकडे नोंदणी केलेला काॅपीराईट हा कोर्टात सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.*
तेव्हा काॅपीराईट ची नोंदणी करणे केव्हाही चांगले आणि फायद्याचे आहे हे लक्षात ठेवावे.
*कॉपीराईट हक्काची कालमर्यादा –*
- सदर कलाकृती निर्माण करणाऱ्या निर्मित्याच्या हयातभर आणि मृत्यूनंतर पुढे ६० वर्षे.
- एखाद्या कलाकृतीचे एक पेक्षा अधिक निर्माते असतील तेव्हा त्यातील शेवटचा निर्माता जेव्हा मृत्यू पावेल त्यानंतर पुढे ६० वर्षे.
*महत्त्वाचा मुद्दा –*
- कॉपीराईट हा त्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीस निर्मितीस मिळते, कल्पनेला नाही. अनेकदा एखाद्या कलाकृतीची कल्पना अनेकांकडे असू शकते. कॉपीराईटसाठी नुसती कल्पना हा महत्त्वाचा घटक नाही तर ती कल्पना कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात यायला हवी. ती कल्पना जेव्हा कोणत्याही रुपात अस्तित्वात येते तेव्हा ती त्या व्यक्तीची अभिव्यक्ती असते. आणि एकाच कल्पनेच्या अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेल्या असतात व त्या अभिव्यक्तीस कॉपीराईट मिळतो. उदा. “पावसावरील कविता” ही कल्पना एक असली तरी प्रत्येक कवी वेगवेगळयाप्रकारे व्यक्त झालेला असतो. किंवा अनेक चित्रपटांच्या कथा मध्ये बँक राॅबरी ही कल्पना समान असली तरी चित्रपटाची मांडणी वेगवेगळी असते.
*कॉपीराईटचे उल्लंघन झाल्यास-*
- कॉपीराईट अधिनियामच्या कलम ६३ अन्वये कोणत्याही कामाच्या कॉपीराईटचे उल्लंघन करणे हा *दखलपात्र गुन्हा* आहे. असे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करता येते.
- पोलीस उप निरीक्षिक अधिकाऱ्यास याप्रकारच्या गुन्ह्याचा तपास करता येतो. तसेच संबधित साहित्य जप्त करता येते.
- शिक्षा – गुन्हा सिद्ध झाल्यास *६ महिने कैद आणि कमीत कमी ५०,०००/- रुपये दंड*
*दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधास १वर्षे कैद आणि १ लाख रूपये दंड*
तसेच कॉपीराईट धारकास सदर कलाकृतीचा गैरवापर थांबविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करून मनाई हुकुम, तसेच नुकसानभरपाई मागता येते.
*कॉपीराईटचे संरक्षण कसे कराल?*
- प्रत्येक लेखक कवी, कलाकार यांनी त्याच्या साहित्य व कलाकृतीवर © हे चिन्ह वापरून स्वतःचे नाव लिहिले पाहिजे. अनेक कवी वा लेखक शेवटी फक्त नाव लिहितात. त्याऐवजी © या चिन्हासह नाव लिहिण्याची सवय लावायला हवी.
- आपण काढलेल्या फोटोंवर तंत्रज्ञानानातील काही तंत्र वापरून © हे चिन्ह टाकणे व नाव लिहिणे शक्य आहे. त्यामुळे तशा प्रकारे © या चिन्हासह नाव टाकूनच ते फोटो पोस्ट करावेत. तसेच मोबाईल मधील लोकेशन हा ऑप्शन चालू ठेवावा. जेणेकरून आपल्या फोटो संबधी माहितीमध्ये फोटो काढल्याचे ठिकाण तसेच दिनांक, वेळ दर्शविले जाते. पुरावा म्हणून याचा आपल्याला उपयोग होतो.
- आपण सतत काही ना काही लिहित असतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याची रजिस्ट्रीकडे नोंद करणे शक्य नाही. व्यवहार्य नाही. असे असले तरी आपल्या काही महत्त्वाच्या दर्जेदार कलाकृतींची रजिस्ट्रीकडे नोंद करावी.
- कॉपी, पेस्ट, फॉरवर्ड इ. तंत्रांमुळे आजकाल मजकूर संपादन/एडीट करणे वा बदल करणे खूप सोपे झाले आहे. तेव्हा कविता वगैरे साहित्य कागदावर लिहून त्याचा फोटो समाज माध्यमावर पोस्ट करावा.
- तसेच आपण केलेल्या कविता, गीते, गझल्स वा कोणत्याही स्वरूपाचे लेखन याच्या नोंदी, टिपणे, कच्चे काम यासाठी वेगळी वही, डायरी करावी व यामध्ये तारीख वार नोंदी ठेवाव्यात. तसेच लिहिलेले साहित्य हे आपल्या संबंधित विश्वासू व्यक्तीला मेल करावे वा स्वतःचा वेगळा इमेल आय.डी. काढून त्यावर त्या त्या वेळी लगेच पाठवावे. यामुळे आपले काम एकत्रित राहील. शिवाय भविष्यात जर एखाद्या साहित्याच्या बाबतीत कायदेशीर प्रश्न निर्माण झाला तर याचा आपल्याला पुरावा म्हणूनही वापर करता येईल.
- लहान मुलांच्या कलाकृतीच्या बाबतीतही © हे चिन्ह वापरून त्यांचे नाव लिहावे. लहान मुलांचे साहित्य प्रसिध्द करताना त्यांची व पालकांची लेखी संमती घेणे योग्य होईल. काही कायदेशीर अडचण आल्यास किंवा त्याच्या साहित्याची चोरी झाल्यास त्यांना त्याच्या पालकांच्या मार्फत तक्रार करता येते.
- तसेच कोणत्याही व्यक्तीला आपले साहित्य वापरण्यासाठी दिल्यास त्याचा लेखी करारनामा करावा. या करारातील अटी व शर्थी या आपल्या साहित्याच्या नैतिक व आर्थिक हितसंबंधास बाधा पोहचविणाऱ्या नाहीत ना याची तज्ञ व्यक्तीकडून खात्री करून घ्यावी.
(* काॅपीराईट चे संरक्षण कसे कराल? या संबधित मुद्द्यावर कायद्यात स्पेसिफिक सांगितले नाही. कॉपीराईटचे संरक्षण करण्यासंबधी मुद्दे मी स्वतः एक वकील व लेखक या कामातील अनुभवातून मांडले आहेत.)
कॉपीराईट संबधित थोडक्यात माहिती दिली आहे.
Comments
Post a Comment