।।अनामिक संघशक्ती।।

।।अनामिक संघशक्ती।।

मध्यंतरी गुजरातच्या प्रवासात साबरकाँठा जिल्ह्यातील इडर गावात जाणे झाले. मुक्कामाची व्यवस्था मुकेशभाई सगर यांच्याकडे करण्यात आली होती. इडर गावात संघाचे तसे खूप जुने काम. तालुकास्थान असलेल्या या गावात संघ रूजवण्यासाठी ज्या कुटुंबांनी अतोनात कष्ट घेतले, त्यात सगर कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. मुकेशभाईच्या तब्बल तीन पिढ्या संघ संस्कारात वाढलेल्या. मुकेशभाईचे घर प्रचंड मोठे असले तरी या घराचा प्रत्येक कोपरा आणि घरातील प्रत्येकाच्या हदयातील कप्पा संघ संस्कारांनी खच्चून भरलेला. घरात गेल्यानंतर आगत-स्वागत झाल्यानंतर थोड्याच वेळात संघाची कुणी माणसं आल्याचे कळाल्याने गुजराती वळणाची साडी परिधान केलेल्या एक आजी घरातून बाहेर आल्या आणि आमच्यात सामील झाल्या. त्या होत्या उर्मिलाबेन... मुकेशभाईची आई. त्यांच वय ८० असल्याचे मुकेशभाईनी सांगितले नसते तर कदाचित कळालेही नसते..एवढ्या कडक! ओळख झाल्यानंतर त्यांनी पूर्वीपासून संघाचे कार्यकर्ते कसे आमच्याकडे येत होते हे सांगत थेट लक्ष्मणराव इनामदार, मधुकरराव भागवत, मधुभाई कुलकर्णी, मनमोहनजी वैद्य यांच्यापासून ते परवा परवा पर्यत प्रचारक म्हणून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची जंत्रीच अगदी न अडखळता आमच्यापुढे सादर केली. नरेंद्र मोदीसुध्दा आमच्याकडे जेऊन, राहून गेल्याचे त्यांनी सांगितले. एका अर्थाने गुजराथमध्ये ज्यांनी संघकार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या स्व. लक्ष्मणराव (वकीलसाहेब) इनामदारांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे शेकडो प्रचारक-कार्यकर्ते ज्यांच्या हातचे जेवण जेऊन आनंदाने तृप्त झाले अशी ही माऊली!

खरंतर भारतातल्या छोट्या पाड्यांपासून ते मोठमोठ्या शहरापर्यत अशा असंख्य उर्मिलाबेन गावागावात आढळतील... ज्यांनी संघ नावाचे एक अद्भुत संघटन उभे करण्यात खूप मोलाची कामगिरी बजावली. एका अर्थाने संघाच्या पाठीमागे उभी असलेली एक ‘अनामिक शक्ती’ म्हणून या मातृशक्तीचा गौरवाने उल्लेख करावा लागेल! ओळखी-पाळखीच्या नसलेल्या... कुठल्यातरी गावातून आलेल्या एका अनोळखी पोरावर आपल्या पोरागत माया करण्यासाठी आईचेच काळीज असावे लागते. संघाच्या पुण्याईने अशा लाखो माता प्रचारक, पूर्णवेळ कार्यकर्त्यांना लाभल्या. ‘आपला पोरगा संघासाठी एवढ्या लांब चाललायं खरा, पण त्याचं कसे होईल?’ असा प्रश्न अनेक प्रचारकांच्या मातांना पडतो हे खरे आहे. पण त्याचे उत्तरही उर्मिलाबेनसारख्या त्या त्या ठिकाणच्या माऊल्यांनी आपल्या निरपेक्ष प्रेमाची पखरण करत सहजपणे दिले आहे. त्यामुळेच असेल कदाचित - एक-दोन वर्षे काम करण्यासाठी निघालेल्या प्रचारकांना समाजाच्या सेवेसाठीची पाच, दहा वर्षे तर काहीजणांना आयुष्य कधी सरले हे कळले देखील नाही! मध्यंतरी ज्याचे व ज्याच्या कुटुंबाचे संघाचे आयुष्य अवघे वर्षभराचे होते असा एक कार्यकर्ता प्रचारक म्हणून निघाला. प्रचारक ही काय भानगड असते याची जराशीही माहिती नसणार्‍या त्याच्या आई-वडिलांनी काही महिन्यानंतर जेंव्हा त्याच्या कार्यक्षेत्राला भेट दिली तेव्हा त्यांना संघ आणि प्रचारक दोन्हीही गोष्टी उमगल्या. त्यापेक्षाही त्याच्या कार्यक्षेत्रातील संघमय झालेल्या घरांनी...त्या घरातील सदस्यांनी आणि त्यातही त्या घरातील माऊलीने आपल्या व्यवहारातून त्यांना संघ समजावून दिला असे म्हणणे योग्य ठरेल.

खूप वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कर्नाटक प्रांताचे सह प्रांतप्रचारक कै. अजितकुमार यांचे एका अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यासोबत गाडी चालवणारे देखील संघाचे प्रांतस्तरावरील कार्यकर्ते होते. त्यांचाही या अपघातात मृत्यु झाला होता. कर्नाटकमधील संघकार्यासाठी हा एक मोठा धक्काच होता. त्यातही त्या प्रांतस्तरीय कार्यकर्त्याच्या मातेवर तर हा दुहेरी आघातच होता. एकतर त्या मातेने आपला पुत्र गमावला होता आणि ज्याच्यावर पुत्रवत माया केली त्या अजितकुमारांसारखा पुत्रही तिला सोडून गेला होता. अजितकुमारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ही माता जेव्हा गेली तेंव्हा अजितकुमारांच्या पार्थिवाचे मस्तक कुरवाळत अत्यंत शोकाकूल अवस्थेत ती माता एवढंच म्हणाली..
‘माझ्या मुलाच्या चुकीमुळे एका सोन्यासारख्या पोराला मी गमावून बसले’!
या मातेच्या मन:स्थितीचे वर्णन कुठल्या शब्दात करणार?
प्रचारक, पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे आलेल्या मुलाची कुठलीही अधिकृत जबाबदारी नसतानाही ‘सर्वस्वी’ जबाबदारी स्विकारणारी ही माऊली म्हणजे एक अलौकीक प्रकरण आहे एवढे मात्र खरे!
उर्मिलाबेनसारख्या जुन्या माऊल्यांचे एक बरे असते की त्यांच्यालेखी घरात येणारे सगळेच कार्यकर्ते ‘संघाचे’ असतात. हा संघाचा, हा विहिंपचा, हा विद्यार्थी परिषदेचा हा कल्याण आश्रमाचा अशी काही भानगड त्यांच्या कधीच डोक्यात नसते. आपल्याकडे आलेला संघाचा प्रचारक आहे, पूर्णवेळ कार्यकर्ता आहे, देशाच्या कामासाठी आपले घरदार सोडून आला आहे, ही बाब पुत्रवत प्रेम करण्याकरिता त्यांच्यासाठी पुरेशी असते. प्रचारक ही संघातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था मानली जाते. ती तशी आहेच, पण ‘प्रचारक’ या व्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यात महत्त्वाचे योगदान कुणाचे असेल तर ते या गावागावात असलेल्या उर्मिलाबेनसारख्या लाखो माऊल्यांचे! घरदार सोडून शेकडो किंवा काहीवेळेस हजारो मैलाच्या अंतरावर संघकामासाठी आलेल्या प्रचारकांचा उत्साह, त्यांची मन:स्थिती टिकून राहण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतीलही... पण ‘माऊली’ या घटकाचे योगदान व स्थान कितीतरी वरचे आहे. देशासाठी एका आईला सोडून आलेल्या प्रचारकांना गावागावात उर्मिलाबेनसारख्या शब्दश: शेकडो आईंचे प्रेम लाभले. त्यातूनच ‘प्रचारक’ या व्यवस्थेला एक दृढता प्राप्त झाली.

संघाच्या कार्याचे मूल्यमापन करताना प्रचारक या यंत्रणेचा उल्लेख होतो, पण या व्यवस्थेला आपल्या घरात... कुटुंबात व आपल्या मनात सामावून घेणार्‍या ‘माऊली’ या अनामिक शक्तीची फारशी चर्चा कुठे होत नाही. आणि आपली कुणीतरी दखल घ्यावी अशी त्या माऊलीला तरी कुठे अपेक्षा असते? आलेल्या कार्यकर्त्याला माया लावणे, प्रेम देणे, जेवायला-खायला घालणे हेच संघकार्यात... राष्ट्रकार्यात तिच्या दृष्टीने तिचे योगदान असते. आणि मुख्य म्हणजे आपण किती महत्त्वपूर्ण काम करत आहोत, याची त्या बिचार्‍या माऊलीला कल्पनाही नसते. त्यामुळे कधीतरी कुत्र्याच्या छत्र्या उगवल्यासारखी मधूनच ‘संघात महिलांना काहीही स्थान नाही’ अशी चर्चा सुरू होते. संघाबाबत बेताचेच ज्ञान असणारी काही विद्वान मंडळी घसा फोडून या विषयावर चर्चा करतात तेव्हा करमणूक होते. पण संघात महिलांचा केवळ सहभागच नाही तर अख्खा संघच माऊली, वहिनी आणि भगिनी यांच्या रूपात असलेल्या मातृशक्तीने आपल्या अलौकीक सामर्थ्याच्या बळावर तोलून धरलायं हे त्यांना कसे समजणार?

-महेश काळे
#amrutsanchay #RSS

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained