*कोपर्डी खटल्याच्या १४५ पानी निकालात नेमकं काय म्हटलं आहे?*
कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीनही नराधमांना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. पण या पूर्ण निकालात कोर्टाचं काय म्हणणं आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. पाहा कोपर्डी खटल्यातील निकालात नेमकं काय म्हटलं आहे.
१३ जुलैला बलात्कार हत्या झाला
१४ जुलैला मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला पोलिसांनी अटक केली
एकूण ३१ साक्षीदार तपासले
निकालाच्या सुरुवातीला जज म्हणतात:
‘एकीकडे मुलीला लक्ष्मी आणि दुर्गा म्हणून मानलं जातं दुसरीकडे याच मुलीला फक्त मुलगी आहे म्हणून हिंसा, वेदना आणि अपमानाला सामोरं जावं लागतं मरावं लागतं. जो आत्मसन्मान घेऊन ती जन्माला आली तो अत्यंत क्रूर, अमानवी आणि रानटी पद्धतीने संपवला जातो. देशातील सर्वांसाठीच एक उदाहरण आणि डोळे उघडायला लावणारी ही घटना आहे.’
निकाल देण्यापूर्वी जजने विचारात घेतलेले पाच मुद्दे:
१. १३ जुलैला संध्याकाळी ७.३५ ते ८.१५ च्या दरम्यान पीडितेची हत्या झाली हे फिर्यादी पक्षानं सिद्ध केलं आहे का? हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार झाला हे सिद्ध केलं आहे?
२. मुले लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याप्रमाणे पीडित मुलगी अल्पवयीन होती हे सिद्ध झालं आहे का?
३. तिन्ही आरोपींनी संगनमताने/कट रचून मुलीचा विनयभंग केला, बलात्कार केला आणि हत्या केली हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलं आहे का?
४. कट करुन हा गुन्हा करण्याच्या १-२ दिवस आधी तिन्ही आरोपींनी या मुलीची छेड काढली होती, अपशब्द बोलले होते आणि तिला धमकी दिली होती हे फिर्यादी पक्ष सिद्ध करु शकला आहे का?
५. मुख्य आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला आहे का? आणि इतर दोन्ही आरोपींनी हा गुन्हा करण्यात त्याला साथ दिली आहे हे सिद्ध केलं आहे का?
हे सर्व मुद्दे सिद्ध करायची जबाबदारी फिर्यादी पक्षावर होती.
या पाचही प्रश्नांवर सर्व आरोपप्रत्यारोप, साक्षीपुरावे, उलटतपासणी, वादविवाद, युक्तिवाद चालला, या सर्व पाच प्रश्नांची उत्तरे ‘हो’ अशी आली आणि त्यानंतरच जजने निकाल दिला.
यानंतर निकालात सर्वात महत्वाचे ठरले परिस्थितीजन्य पुरावे, फिर्यादी पक्षाची संपूर्ण मदार होती परिस्थितीजन्य पुराव्यांवर त्यामुळे या सर्व पुराव्यातून या तीन आरोपींनीच गुन्हा केला आहे हे आणि हेच सिद्ध होणं गरजेचं होतंअसं निकालात म्हंटलं आहे.
काय होते परिस्थितीजन्य पुरावे:
१. मुलीच्या मृतदेहाजवळ सर्वात शेवटी पाहिली गेलेली व्यक्ती होती मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे
२. तिन्ही आरोपींची आधीची आणि गुन्ह्यानंतरची वागणूक
३. तिन्ही आरोपींनी केलेलं कट कारस्थान
४. आरोपींचा हेतू (Motive)
५. वैद्यकीय पुरावे (Medical Evidence)
६. वैज्ञानिक पुरावे (Scientific Evidence)
निकालात एकूण १४५ पानं, १७९ मुद्दे
२९ तारखेला फाशीची शिक्षा सुनावल्याची शेवटची ऑर्डर १९ मुद्द्यांची…
इतर मुद्दे:
– मुलीची सायकल पडलेली दिसली, तिला शोधत आलेले लोक तिला हाक मारत असतानाच कडुलिंबाच्या झाडाखाली नग्न अवस्थेत पडलेली मुलगी दिसली. जवळच उभा आरोपी क्रमांक एकला पाहून साक्षीदाराने उच्चारलेलं पहिलं वाक्य
पप्या, थांब काय करतोस तिथे?
या लोकांना पाहून जितेंद्र शिंदे कोपर्डी गावाकडे पळण्यासाठी बाजरी शेतात घुसला
– आरोपींचा हेतू सिद्ध करण्यासाठी मुलीच्या मैत्रिणीने दिलेली साक्ष महत्वाची ठरली. घटनेच्या १-२ दिवस आधी शाळेतून परतत असताना आरोपी जितेंद्र शिंदे आणि इतर दोघे एका मोटारसायकलवरुन आले आणि रस्ता अडवला, अश्लील शेरेबाजी केली, या मुलीच्या हाताला धरत तिला चारीकडे जबरदस्तीने ओढू लागला तेव्हा तो म्हणत होता – तुला मी माझे कामच दाखवतो. त्यावेळी मैत्रिण जोरजोरात रडू लागली हे पाहून इतर दोघे म्हणाले, ‘पप्या, आपण तिला नंतर आपले काम दाखवू’
– या केसमध्ये आरुषी तलवार हत्या प्रकरणाचाही उल्लेख आणि आधार घेण्याचा बचाव पक्षाने प्रयत्न केला.
– १७८ क्रमांकाच्या मुद्द्यात शेवटाकडे/निष्कर्षाकडे जाताना जज सुवर्णा केवले यांनी केलेली नोंद महत्वाची:-
ज्या पद्धतीने आरोपींनी आपल्याच गावातील मुलीवर हा अत्याचार केला आहे ते बघता आरोपींना कोणतीही दयामाया दाखवायची गरज नाही. आरोपी बदलण्याची आणि सुधरण्याची कोणतीही शक्यता नाही. समाज किंवा गावच काय आरोपी त्यांच्या स्वत:च्या कुटुंबासोबत राहायच्या लायकीचेही नाहीत. आरोपींना लहान मुलं आहेत, म्हातारे आईवडील आहेत ही वस्तुस्थिती असली तरी ती बाब जगावेगळी नाही, उलट ज्यांच्यावर परिवार अवलंबून आहे त्यांनी माणूस म्हणून जास्त जबाबदारीने वागणं अपेक्षित होतं.
सुनावणीच्या काळात तिन्ही आरोपींना थोडाही पश्चाताप किंवा दु;ख झाल्याचं दिसलं नाही, ज्यांना आपल्या दुष्कृत्याचा पश्चाताप नाही, खेद नाही अशी माणसं सुधारतील अशी आशा ठेवणं चुकीचं ठरेल.
शिक्षा देताना आरोपींच्या वयाचा विचार करायचं ठरवलं तर मग ह्यांनी जिचा जीव घेतला त्या मुलीच्या वयाचा आधी विचार करावा लागेल. ती फक्त १५ वर्षाच्या मुलीवर अमानुष बळजबरी करत, तिचं आयुष्य आरोपींनी अत्यंत क्रूर आणि निष्ठूर पद्धतीने संपवलं. आरोपींनी आपली बेलगाम वासना शमवण्यासाठीच नियोजन करुन तिच्यावर जबरदस्ती केली. त्यामुळे आरोपींचं वय, त्यांनी केलेलं दुष्कृत्य आणि त्यांच्या क्रौर्याला बळी पडलेल्या मुलीचं वय बघता दया दाखवायला जागा उरत नाही.
या घटनेमुळे फक्त अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील प्रत्येकाला धक्का बसला आहे, मन सुन्न झालं आहे. खरं तर आरोपींना कितीही कठोर शिक्षा दिली तरी त्या मुलीच्या कुटुंबीयांच्या आणि गावातील इतर मुलींच्या मनावर झालेला आघात, वेदना, नुकसान भरुन येणार नाही. त्यामुळे माझ्या मते या गुन्ह्यासाठी फक्त फाशीची शिक्षा देणंच योग्य ठरेल. मुली अबला आहेत त्या तक्रार करु धजणार नाही असं समजून दुष्कृत्य करायचे विचार ज्यांच्या डोक्यात असतील, जे वाकड्या नजरेनं मुलीकडे बघतील त्यांना जरब बसायलाच हवी आणि समाजात एक कठोर संदेश जायला हवा.
‼‼‼‼‼‼‼‼‼‼
Comments
Post a Comment