*डीएसकेंचा अस्त ही पुणेकरांच्या पायावर कुर्‍हाड ठरेल!*

*डीएसके सद्या आर्थिक संकटात आहेत; परंतु त्यांच्यावरील छापे व कारवाईसत्राने आम्हाला वेगळाच वास येऊ लागला आहे. डीएसकेंना उद्योग-व्यवसायातून संपविण्यासाठी पुण्यातील एक चांडाळ चौकडीच सक्रीय झाली असून, त्याला जातीयद्वेषदेखील चिकटलेला आहे. खरे तर डीएसकेंवरील संकट हे मोदीं धोरणाचा तातडीने झालेला परिणाम आहे. 
आज डीएसके जात्यात आहे तर उद्या इतरही सुपातील बिल्डर आणि उद्योजक जात्यात जाणारच आहेेत. डीएसकेंना उद्ध्वस्त करण्यासाठी, पुण्यातून संपविण्यासाठी जे घटक कामाला लागलेत, त्यांचा कावा पुणेकरांनी ओळखायला हवा. पुणेकरांना परवडणारी आणि मनासारखी घरे फक्त डीएसकेंनीच दिली, हेही लक्षात ठेवायला हवे. डीएसकेंचा अस्त हा उद्या पुणेकरांनी स्वतःच्याच पायावर पाडून घेतलेली कुर्‍हाड ठरेल, हा आमचा इशारा वेळीच लक्षात घ्यावा!*
--
लक्षात घ्या, दीपक सखाराम कुलकर्णी या मराठी आणि त्यातही जातीने ब्राम्हण असलेल्या एका चांगल्या उद्योजकाला संपविण्यासाठी अनेक घटक एकत्र आलेले आहेत. दीपक कुलकर्णी म्हणजेच डीएसके यांनी कोणताही घोटाळा, भ्रष्टाचार केलेला नाही. या उद्योजक व्यक्तीने बांधकाम व्यवसायासाठी बँकांच्या दारापुढे मोठा हात न पसरता सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांपुढे हात पसरला. त्यापोटी त्यांना घसघशीत व्याज देण्याचे आश्वासन दाखविले. लोकांनीही त्यांच्या विश्वासावर त्यांच्याकडे ठेवी ठेवल्या. या ठेवींवर मागील दोन ते तीन महिन्यांपर्यंत अनेकांना व्याजही मिळाले. परंतु, सकारात्मक चर्चेपेक्षा नकारात्मक चर्चा जरा जास्तच जोरात चालू असून, ती हेतुपुरस्सर केली जात आहे. 
पुण्यातील अनेकांना डीएसकेंचे अस्तित्व नष्ट करायचे आहे. डीएसके आता मरतच आहेत तर त्यांच्या नरडीवर शेवटचा एक पाय आपणही टाकावा, अशी भूमिका अनेकजण घेत आहेत. बांधकाम व्यवसायातील अनेकांनी हे पाय देण्याचे काम सुरु केले अन् त्याद्वारे एक स्पर्धक ते संपवित आहेत. डीएसकेंची राजकीय महत्वकांक्षा पाहाता, भविष्यात हा माणूस डोकेदुखी ठरू शकतो म्हणून राजकीय पक्षही अखेरचा पाय देण्याचे काम करत आहेत. 
2009च्या लोकसभा निवडणुकीत डीएसकेंनी 63 हजार मते घेतली होती, हे राजकीय मंडळी विसरलेली नाहीत. डीएसकेमुळेच अनिल शिरोळे अगदी कमी फरकाने पडले याची खदखद सत्ताधारी भाजपच्या डोक्यात होतीच! पुण्यातील ब्राम्हण नसलेल्या परंतु उच्चवर्णीय असलेल्या दोन मोठ्या उद्योजकांनाही डीएसकेंना संपलेले पाहायचे आहे; डीएसकेंचे बांधकाम क्षेत्रातील आणि एकूणच पुण्यातील उद्योजकीय क्षेत्रातील अस्तित्व या दोघांना नेहमीच खटकत आले आहे. म्हणून, पुणेकरांनो डीएसकेंना संपविण्यासाठी अनेक घटक एकत्र आलेले आहेत. आता डीएसके संपले तर तुम्ही तुमच्याच पायावर कुर्‍हाड पाडून घेणार आहात. 

डीएसकेंनी पुणेकरांना त्यांच्या बजेटमधील घरे दिली. अगदी व्यवहार होतानाही हा माणूस पुणेकरांच्या पदरी हक्काचे घर पडावे, असा विचार करत होता ते तेव्हा तुम्ही पाहिलेच आहे. जुन्या जागा विकसित करतानाही या माणसाने दोन भावांत भांडणे लावून दिली नाही; उलटपक्षी त्यांच्यातील संपत्तीचा वाद मिटवून दोघांनाही दोन पैसे जास्त देत, काही सदनिका देऊन पुणेकर म्हणून त्यांची ओळख ठेवली. व्यावसायिक गणिते सोडविताना मूळ पुणेकरांची मानसिकता त्यांनी कधीच अव्हेरली नाही. या मानसिकतेचा सन्मान ठेवूनच हा माणूस घरे बांधत होता, तो मध्यमवर्गीयांना देत होता. पुण्यात हक्काचे घर या लोकांना करून देत होता. आता डीएसके उद्ध्वस्त झाले, संपले तर त्याचा सर्वाधिक फटका या मध्यमवर्गीय पुणेकरांनाच बसेल. दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते. लोकांचे घेतलेले पैसे घेऊन डीएसके कधीच पळून जाणार नाहीत. देणी द्यायची ही भाषाच ते बोलत आहेत.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका  निर्णयाने डीएसके संकटात सापडले आहेत. व्यावसायिक स्वप्ने पाहाताना त्यांच्या हातून काही चुकाही झाल्या असतील; म्हणून ते कुणाचे पैसे बुडविणार नाही. एकाचवेळी सर्वांनी पैसे मागितल्याने हा माणूस अडचणीत सापडला; त्याला खतपाणी घालून वातावरण पेटविले जात आहे. म्हणून डीएसके सावरले पाहिजेत, पुणेकरांच्या हितासाठी आणि भावी पिढीलाही परवडणारी घरे बांधून देण्यासाठी डीएसके या संकटातून बाहेर आले पाहिजेत. त्यांना कारागृहात पाहण्याची ज्यांना घाई झाली आहे, डीएसकेंचे उद्योगविश्व उद्ध्वस्त झालेले पाहण्याची ज्या व्यावसायिक प्रतिस्पर्धी, राजकारण्यांना घाई झाली आहे, तेच खरे पुणेकरांचे शत्रू आहेत. या शत्रूंचा डाव ओळखता आला पाहिजेत. 

पळून जाण्याची मानसिकता असती तर डीएसके कधीच गेले असते. एक पाय भारतात अन् दुसरा पाय विदेशात ठेवणारा हा माणूस यापूर्वीच अब्जावधी रुपयांचा गंडा घालून पळून गेला असता. मद्यसम्राट विजय मल्ल्या पळाला त्याचे कुणी काय वाकडे केले? 
परंतु, डीएसकेंची नियत साफ आहे, म्हणूनच या माणसाने आपला पासपोर्टच पोलिसांच्या ताब्यात दिला. आर्थिक संकट काय आज आहे, उद्या ते संपेल. जेवढ्या रकमेची देणी द्यायची आहे, त्यापेक्षा जास्त रकमेची मालमत्ता त्यांच्याकडे आहेच; त्या मालमत्तेच्या विक्रीतून देणी दिली जाईल, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. परंतु, डीएसकेंच्या मागे पोलिस लावून, चौकशीचा ससेमिरा लावून आणि त्यांच्या घरे आणि कार्यालयावर छापे टाकून जी वातावरण निर्मिती केली जात आहे, त्यातून डीएसकेंनी मोठाच घोटाळा केला असे भासविले जात आहेत; त्यासाठी पुण्यातील जी चांडाळचौकडी कारस्थाने रचत आहेत ती कारस्थाने पुणेकरांनी लक्षात घ्यायला हवी. पुण्यावर आमचेच वर्चस्व हवे असे ज्या उद्योजकांना वाटत आहे, त्या लोकांनीच राजकारणातील आपले सगेसोयरे वापरून डीएसकेंना शेवटचा दणका देण्याची खेळी रचली आहे. अत्यंत दुर्देवाने नमूद करावे वाटते की या खेळीत डीएसके संपतील, अशी सार्थ भीती आम्हाला वाटते आहे. 
*गरिबीचे चटके सहन केलेला माणूस फसविणार नाही!*
डीएसके सद्या परिस्थितीशरण आहेत. परंतु, गरिबीचे भयानक चटके सहन केलेला हा माणूस कुणालाही फसवू शकेल असे वाटत नाही. डीएसकेंनी अंदाजे आठ हजार लोकांकडून पैसे घेतले. त्यापैकी केवळ अडिचशे-तिनशेच लोकं फसवणूक झाल्याची तक्रार करत आहेत. वास्तविक ती फसवणूक नाही. त्यांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंनी काही मालमत्तादेखील विक्रीस काढली आहे. परंतु, नोटाबंदीनंतर मोठे व्यवहार करणे अडचणीचे आहे. अनेकांना डीएसकेंशी व्यवहार करायचे आहेत, परंतु मोठ्या रकमेची उलाढाल करताना आरबीआयची परवानगी घ्यावी लागते, आरबीआय ही माहिती प्राप्तिकर खात्याला देते आणि त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत, व्यवहारही करायचे आहेत ती माणसे इच्छा असूनही डीएसकेंशी व्यवहार करू शकत नाहीत. अनेकजण तर बाजारभावापेक्षा कमी किमतीत डीएसकेंना मालमत्ता मागून वेठीस धरत आहेत. येथेच डीएसके अडचणीत सापडले आहेत. अन्यथा, डीएसकेंकडे मालमत्ता विक्रीतून आत्ताच पैसे आले असते व त्यांनी सर्वांची देणीही चुकती केली असती. परंतु, विक्रीचे व्यवहार रखडल्याने डीएसकेंच्या अडचणीत भर पडली. जेवढी देणी द्यायची आहे, त्यापेक्षा जास्त मालमत्ता डीएसकेंकडे आहे, ही वस्तुस्थिती कुणाच्या लक्षातच येणार नाही, असे वातावरण मुद्दामहून निर्माण केले जात आहे. 

कसबा पेठेत जन्मलेल्या कुलकर्णी यांचे बालपण गरिबीचे चटके सहन करण्यात गेले. कैर्‍या लोणचे विकण्यापासून ते पेपर टाकण्यापर्यंतची सर्व कामे या माणसाने केली आहेत. वयाच्या सातव्या वर्षापासून काही तरी विकले की दोन पैसे मिळतात हीच शिकवण त्यांनी मनावर बिंबवली. म्हणूनच, 1600 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करताना दोन चांगली घरे विकली की दोन पैसे चांगले मिळतात, ही शिकवण ते अंगी बिंबवू शकले आहेत. व्यावसायिक प्रतिस्पर्धी म्हणून आज पुण्यातील दोन मोठ्या उद्योजकांना डीएसके सलतात. बांधकाम व्यावसायात तर त्यांनी अनेकांशी व्यावसायिक शत्रूत्व पत्कारले. त्यांच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टच्या निमित्ताने तर पुण्यातील अनेक बिल्डरांचे धाबे दणाणले होते. पुण्यातील बिल्डरांना बुकिंगसाठी, घरे, सदनिका विकण्यासाठी मोठी जाहिरातबाजी करूनही ग्राहक मिळत नाहीत. परंतु, डीएसकेचा प्रकल्प पूर्ण होण्याआधीच त्यातील सदनिका व घरे विकल्या गेलेली असतात. या उलटपक्षी डीएसकेचा नवीन प्रकल्प कधी येतो याची लोकं वाट पाहात असतात. पुण्यात साडेचारशे ते सातशे चौरस फुटाची घरे आणि तीही प्रत्येकाला स्वप्नातील वाटावीत, अशी केवळ डीएसकेच बांधू शकतात. या घरांत घरपण असते, म्हणून डीएसके म्हणजे घराला घरपण देणारा माणूस पुणेकरांना वाटतो. तेव्हा डीएसकेंनी अनेकांना फसवले, लाखो रुपयांना चुना लावला, असा जो बोभाटा आता निर्माण करण्यात आलेला आहे, त्यामागचे षडयंत्र प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. एखादा ब्रॅण्ड निर्माण करण्यासाठी, एखादा उद्योग उभा करण्यासाठी अहोरात्र झटून रक्ताचे पाणी करावे लागते, दीर्घ परिश्रम, चिकाटी, धोका पत्कारण्याची तयारी, आणि लोकांचा कमावलेला विश्वास यातून तो उद्योग, ब्रॅण्ड निर्माण होत असतो. डीएसकेदेखील याच कठोर तपस्येतून निर्माण झालेला ब्रॅण्ड आहे. 

आता चिमूटभर लोकं आर्थिक संकटाच्या निमित्ताने या ब्रॅण्डच्या मुळावर उठले आहेत. या संकटाने डीएसके कोसळून पडले तर ते पुन्हा उभे राहणे अशक्य आहे. आणि, डीएसके पुन्हा उभे राहिले नाही तर त्यांच्यासारखी परवडणारी, पुणेकरांच्या मानसिकतेतून साकारलेली घरे दुसरे कुणीही देऊ शकणार नाही. घरांचा व्यापार मोठा आहे, आणि पुण्यात तो करणारे व्यापारीही मोठे आहेत. मग् पुणेकरांना या व्यापार्‍यांच्या लुटीला सामोरे जावे लागेल. पुण्यात एकही अशी मालमत्ता नाही की जी डीएसकेंनी गुंडगिरी करून, राजकीय दबाव आणून बळकावली असेल. एखाद्या भूखंडाचा श्रीखंड खाल्ला असेल किंवा कुणाची तरी व्यवहारात फसवणूक केली असेल. सचोटी आणि नीतीने व्यवसाय करणार्‍या डीएसकेला आता संपविले तर उद्या जी माणसे या व्यवसायात उरणार आहेत, ते पुणेकरांच्या मुळावर उठणारी असतील. मुंबईतील जुन्या चाळींचे झाले तसेच पुण्यातील जुनी घरे व वाड्यांचेही झालेले दिसेल. 

*डीएसके ही पुणेकरांची गरज!*
पुण्यातील झाडून सर्व प्रसारमाध्यमे डीएसकेंच्याविरुद्ध आवाज उठवित असताना आम्ही डीएसकेंची बाजू घेण्याचे धारिष्ट्य दाखवित आहोत. यामागचे खरे कारण हेच आहे की डीएसके या संकटातून सावरले पाहिजेत, कारण ती पुणेकरांची गरज आहे. डीएसके हे पुणेकरांचा चेहरा आहे. संकटे ही वादळासारखी येतात अन् आली तशी निघूनही जातात. ज्या लोकांना डीएसकेंना तुरुंगात डाबायचे आहे, त्यांचा हेतू शुद्ध नाही. मुळात या आर्थिक संकटाच्याआडून अनेकांना अनेक बाबी साध्य करून घ्यायच्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे डीएसकेसारखा व्यावसायिक प्रतिस्पर्धी संपतो याचा पुण्यात अनेकांना आनंद झाला असून, त्यांना फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या आम्ही पाहात आहोत. डीएसकेंनी 2009 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत तब्बल 8.57 टक्के म्हणजेच 62 हजार 981 मते डीएसकेंना मिळाली होती. त्यामुळे भाजपचे अनिल शिरोळे हे काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्याविरोधात केवळ 25 हजार मतांच्या फरकाने पडले होते. याचाच अर्थ डीएसकेंची राजकीय मनिषा कधीही लपून राहिली नाही आणि भविष्यात आमदार व्हावेत इतकी मते तर त्यांना नक्कीच मिळतात, एवढी त्यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे आज ना उद्या डीएसके डोईजड ठरतील या भीतीपोटी मिळालेल्या संधीचा गैरफायदा घेण्याकरिता पुण्यातील राजकीय चौकडीच सक्रीय झालेली आहे. हीच चौकडी पुण्यातील दोन मोठ्या उद्योजकांचे सोयरे-धायरेदेखील आहेत. म्हणजेच एकूण काय तर डीएसके हे केवळ व्यावसायिक, आर्थिक, राजकीयच नाही तर खासकरून जातीयबळीदेखील आहेत. ज्यांनी राजकारणात जातीचे हत्यार वापरून आपली ताकद वाढविली तीच माणसे आता डीएसकेंच्या मुळावर उठलीत. खरे तर आजच्या परिस्थितीत डीएसकेंना सावरण्यासाठी आणि लोकांची देणी देण्यासाठी वेळ देणे ही गरजेची बाब आहे. परंतु, त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त गुन्हे दाखल होतील, त्यांना तातडीने अटक होईल यासाठी यंत्रणा वापरली जात आहे. डीएसके पोलिस यंत्रणेला चौकशीसाठी सहकार्य करत असताना, त्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे का टाकण्यात आले? हे छापे केवळ हतबल झालेल्या गुंतवणूकदारांना आणखीच घाबरून सोडण्यासाठी आणि डीएसकेविरोधातील नकारात्मक वातावरण आणखीच गंभीर करण्यासाठी होते. डीएसके उद्ध्वस्त होतच आहेत, तर आपणही त्यांच्या नरडीवर शेवटचा पाय देऊन घ्यावा, ही व्यावसायिक, जातीयद्वेषाची क्रूर मानसिकता पुणेकरांनी ओळखायला हवी. डीएसकेंच्या पाठीमागे उभे राहायला हवे. लक्षात ठेवा, डीएसके उद्ध्वस्त होण्यापासून वाचले पाहिजेत. पुणेकरांना पुढील असंख्य संकटापासून वाचायचे असेल तर डीएसके वाचले पाहिजेत!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034