मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन चे नाव बदलून 'जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक' करण्याची विनंती
ALERT CITIZENS FORUM OF INDIA
A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601 #
प्रति,
मा. रेल्वे मंत्री,
भारत सरकार,
नवी दिल्ली .
महोदय,
विकासाची वाट स्वकीयांना दाखवण्यासाठी मुंबईच्या रेल्वेपासून अनेक उपक्रमांत आघाडीवर असणारे आणि स्थानिकांची, एतद्देशीयांची बाजू समजून घेऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणारे नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ.
नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबई चे शिल्पकार मानले जाते.
मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता.
विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती. नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.
एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घघाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
तर अशा महापुरुषाच्या कार्याचा योग्य तो आदर व्हावा व त्यांना वंदन म्हणून सरकार ने त्यांचे वास्तव्य असलेल्या गिरगाव परिसरा जवळ असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशन चे नाव बदलून " जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक" असे ठेवावे ही आग्रहाची विनंती.
31 जुलै रोजी नानांचा स्मृति दिवस आहे. त्याचे औचित्य साधून घोषणा केल्यास सोने पे सुहागा ठरेल.
आपले सहकार्येच्छुक,
अॅलर्ट सिटीझन्स फोरम साठी,
दयानंद नेने ( ८८७९५२८५७५)
अध्यक्ष
अॅलर्ट टीम: जितेंद्र सातपुते, प्रसाद बेडेकर, अनिरुद्ध गोडसे, प्रमोद दाते, किरण जोशी, संध्या मल्होत्रा, राजन चांडोक
CC : श्री अरविंद सावंत, खासदार,
आपण या कार्यात मदत करावी ही नम्र विनंती
Comments
Post a Comment