*इस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र,* *जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय!*

*इस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र,* *जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय!*




असं म्हणतात कि संकटाच्या काळी जो उभा रहातो तोच खरा मित्र. फायद्यासाठी कोणी मित्र होतात तर काही, वेळ बघून जवळ येतात. तर काही पक्के मित्र रहातात. पण काही असे असतात कि जे एका हाकेवर धावून येतात. इस्राइल हा भारताचा असाच एक मित्र देश. बघायला गेलं तर भारताच्या दृष्ट्रीने अगदी छोटा पण त्याची महती अशी आहे कि भले भले देश त्याच्यापासून वचकून आहेत.
आजपासून सुरु होणारा पंतप्रधानानचा इस्राइल दौरा म्हणूनच खूप महत्वाचा आहे. गेल्या ७० वर्षात भारताच्या एकही पंतप्रधानांनी इस्राइल चा दौरा केला नव्हता. ह्या मागची भूमिका हि महत्वाची आहे. इस्राइल हा छोटासा देश चारी बाजूंनी मुस्लीम राष्ट्रांनी वेढलेला आहे. इस्राइल – पॅलेस्टाईन वाद तर अजूनही न सुटलेल्या काश्मीर प्रश्नासारखा प्रश्न आहे. ह्यावरून ह्या दोन्ही देशात युद्ध हि झालेली आहेत. इस्राइल चे अनेक देशांसोबत राजनैतिक संबंध पण नाहीत. ह्यात प्रामुख्याने मुस्लीम राष्ट्र हि सामील आहेत.
अनेक वर्षांच्या अत्याचारावर जर मात करायची असेल तर स्वतःला सक्षम बनवून त्या अत्याचाराचा प्रतिकार हाच एक मार्ग आहे. हि खूप मोठी शिकवण माझ्या मते इस्राइल ने जगाला दिली आहे.
बंदुकीच्या गोळीला बंदुकीच्या गोळीची भाषा कळते – शब्दांची भाषा कळत नाही, हे इस्राइल ने आधीच ओळखलं. भारताला ते आता कळायला लागलं आहे. इतके वर्ष संयमाची भाषा भारत करत होता. गेल्या काही महिन्यात ५० पेक्षा जास्त आतंकवाद्यांनां भारतीय आर्मी ने कंठस्थान घातल आहे. हा लेख लिहित असताना सुद्धा ३ आतंकवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर ह्या सगळ्या छुप्या युद्धात जगात इस्राइल सगळ्यात निष्णात देश समजला जातो. मग ते विविध आयुध असोत, पिस्तोल असोत, बुलेट प्रुफ ज्याकेट असोत वा अगदी ड्रोन विमान असोत. इस्राइल तंत्रज्ञान जगात अत्याधुनिक म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे.
सैनिकी सामानाशिवाय इस्राइल स्पेस सायन्स, रिमोट सेन्सिंग उपग्रह आणि *भारताची भिस्त ज्यावर अवलंबून आहे त्या शेती च्या क्षेत्रात “दादा” आहे.* *शेतीवर त्यांनी केलेल्या संशोधनाला तोड नाही.* *एकेकाळी पाण्याच दुर्भिक्ष असलेला हा देश आता पाण्याने समृद्ध तर आहेच पण सध्या त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त पाण्याची उपलब्धी आहे.हे सारं तंत्रज्ञान, मग ते शेती असो पाणी किंवा सुरक्षा सगळंच इस्राइल ने भारताला सशर्त देण्याची तयारी केली आहे.* *जे तंत्रज्ञान अमेरिका किंवा अगदी रशिया पण भारताला देण्यापासून कचरतात. ते तंत्रज्ञान मेक इन इंडिया अंतर्गत पूर्णतः इस्राइल भारताला देणार आहे.*

रशिया, अमेरिका नंतर भारताला सैन्य सामुग्री देण्यात इस्राइल तिसरा सगळ्यात मोठा देश आहे.
१९६२ चं युद्ध असो वा १९९९ चं कारगिल युद्ध असो. आपल्या देशाने एक हाक दिल्यावर सगळ्या युद्धात इस्राइल भारताच्या पाठीशी उभा तर राहिलाच, पण कोणताही किंतु नं ठेवता भारताला त्याच क्षणी हवी असलेली सुरक्षा सामुग्री अगदी वेळेत उपलब्ध करून दिली. १९६५ च्या युद्धात पण चीन च्या विरुद्ध भारताला इस्राइल ने सैनिकी मदत केली होती. जगातील कोणत्याच राष्ट्राला नं जुमानता आपल्या मित्राला मदत करूनसुद्धा भारतीय राजकारणी लोकांनी इस्राइलचं महत्व वाढू दिलं नाही. ह्याला कारण होतं मुस्लीम राष्ट्रांची नाराजी. इस्राइल चे पाकिस्तान शी कोणतेच राजनैतिक संबंध नाहीत. तसेच इराक, इराण, लिबिया पासून सगळ्याच मुस्लीम राष्ट्रांशी कोणतेच संबंध नाहीत. भारतातील राजकारणी किंवा भारताची भूमिका हि नेहमीच सर्वसमावेशक राहिली आहे. पण तिला अस मूर्त स्वरूप देण्यात आपण मागे पडलो ही शोकांतिका आहे.
पंतप्रधानांचा इस्राइल दौरा हा सगळ्याच शत्रूच्या पोटात खुपतो आहे. स्पेशली चीन आणि पाकिस्तानच्या. कारण इस्राइलचं युद्ध तंत्रज्ञान अमेरिकेपेक्षाही श्रेष्ठ समजले जाते. तसेच अतिरेक्यांशी त्यांनी घेतलेली युद्धाची भूमिका ही. अश्या वेळेस भारत आणि इस्राइल जर दोन्ही देश अजून सहकार्य वाढवत जवळ आले तर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. चीनला चिंता वेगळीच आहे. भारत- अमेरिका – इस्राइल असा गट तयार होतो आहे. चीन च्या आशिया मधल्या वर्चस्वाला टक्कर देण्याची ताकद फक्त भारत बाळगून आहे. त्याच्या जोडीला इस्राइल सारखे खरे मित्र असतील तर चीनला ते पचवणं जड जाणार आहे.
गेल्या ७० वर्षात आपण एका सच्या मित्राला खूप अंतरावर ठेवलं होतं. पहिल्यांदा ७० वर्षात त्याला जवळ करण्याची राजकीय इच्छाशक्ती आपल्या पंतप्रधानांनी दाखवली. म्हणून त्यांच्या स्वागताला इस्राइलचे पंतप्रधान विमानतळावर स्वतः जाणार आहेत. हा मान फक्त पोप आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ह्यांनाच देण्यात येतो. असं असताना भारताला हा मान देताना इस्राइल ने पुन्हा एकदा आपल्या सच्च्या मैत्रीचं रूप दाखवलं आहे. ह्या वेळेस इस्राइल मध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण पहिल्यांदा भारताकडून त्याच विश्वासाची परतफेड एका भारतीय पंतप्रधानांकडून होताना दिसते आहे. ही भेट प्रचंड यशस्वी तर ठरेलच पण एका जुन्या आणि सच्च्या मित्राला जवळ करताना दाखवलेली राजकीय परिपक्वता भारताला खूप पुढे घेऊन जाईल आणि शत्रूच्या गोटात खळबळ माजवल्या शिवाय राहणार नाही.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained