दाखवायचे 'सुळे' - भाऊ तोरसेकरांचा आणखी एक सुंदर लेख:

भाऊ तोरसेकरांचा आणखी एक सुंदर लेख:
दाखवायचे 'सुळे'
सुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गेल्या लोकसभेत जिंकणे इतके अवघड झाले होते, की पित्याला कन्येसाठी नरेंद्र मोदींना बारामतीत प्रचाराला येऊ नका, अशी गळ घालावी लागली होती. मोदींनीही पवारांना अभय दिले आणि म्हणून आज सुप्रिया सुळे संसदेत दिसू शकत आहेत. कारण निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच सर्वात कमी फ़रकाने बारामतीत कुणा पवारांना यश टिकवावे लागलेले आहे. अशी आपली अवस्था कशामुळे झाली, त्याचा विचार अजून शरद पवार करायला तयार नाहीत, तर त्यांची कन्या कशाला करील? त्यापेक्षा नित्यनेमाने तोंडाची वाफ़ दवडण्याला त्यांनी प्राधान्य देणे स्वाभाविक आहे. मग अशी वाफ़ भाजपावर सोडली जाते तर कधी ती शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोडली जात असते. योगायोग असा, की गेल्या वर्षी पित्याने जे उद्गार काढले; त्याच दिव़शी यंदा सुप्रियाताईंना शिवसेनेची महत्ता आठवली आहे. पुर्वीची किंवा बाळासाहेबांची शिवसेना कशी महान होती आणि आजची सेना कशी लेचीपेची झाली आहे; त्याचे किर्तन करण्यात या बापलेकींची वाचा थकत नाही. पण अशी इतरांची कुंडली मांडून भवितव्य सांगण्यापेक्षा सुप्रियाताईंनी आपला भूतकाळ व भविष्याची चिंता करायला काय हरकत आहे?
किमान आपल्या वर्तमानाची तरी थोडीफ़र फ़िकीर करावी ना? नाव सुळे आहे म्हणून खायचे दात लपवलेच पाहिजेत, अशी सक्ती नसते सुप्रियाताई! अजून महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे वा देवेंद्र फ़डणवीस यांची परिक्षा घेऊन उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुळे मॅडमवर कोणी सोपवलेले नाही. पण खुमखुमी त्यांना गप्प बसू देत नसेल, तर ताईंनी तरी दुसरे काय करावे? दात लपवले तरी सुळे दिसणारच ना?
विदर्भात ताई संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी कोणाशी संवाद साधला ते माहित नाही. पण संवाद दौरा संपल्यावर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलेले आहे. राज्याचा मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी असल्याचे प्रमाणपत्र ताईंनी देऊन टाकलेले आहे. सध्या विविध परिक्षांच्या निकालाचे दिवस असल्याने ताईंनाही निकाल लावण्याचा मोह झाल्यास नवल नाही. म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय काढला. त्यांच्या मते राज्याचा मुख्यमंत्री सलग तीन वर्षे एकाच वर्गात कायम आहे आणि अभ्यासच करत बसला आहे. त्यामुळे त्याला ढ संबोधण्याखेरीज ताईंना पर्याय उरला नाही. एकाच वर्गात म्हण्जे नेमके काय, तेही ताईंनी सांगितले असते तर खुप बरे झाले असते. अर्थात विविध विषयांवर निर्णय घेण्यापुर्वी फ़डणवीस अभ्यास करू असे सांगतात, त्यामुळे ताईंना मुख्यमंत्र्यांची परिक्षा घेण्याचा अनावर मोह झालेला असावा. म्हणून मग अभ्यास आणि परिक्षा अशी सुसंगत शब्दावली त्यांनी वापरलेली असावी. पण एकाच वर्गात म्हणजे काय? सुप्रियाताईंना आपले पिताजी पाव शतकापासून पंतप्रधान पदाच्या परिक्षेला बसत राहिल्याचे ठाऊकच नाही काय? १९९१ सालात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडून देशाच्या पंतप्रधान पदाची परिक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली होती. त्यांचा अभ्यास अजून संपलेला नाही. परिक्षा किती दिल्या वा कोणते पेपर्स कोणी तपासले, तेही ठाऊक नाही. पण अजून पिताश्री ‘ज्येष्ठ नेते’ नामक एकाच वर्गात बसून आहेत. कोणी त्यांना वरच्या वर्गात पाठवत नाही की खालच्या वर्गातही जायला फ़र्मावत नाही. तेही जागचे हलायला राजी नाहीत. मग अशा अभ्यासू विद्यार्थ्याविषयी ताईंचे मूल्यांकन काय आहे? तीन वर्षे एकाच वर्गात बसलेला विद्यार्थी ‘ढ’ असेल, तर पंचवीस वर्षे एकाच बाकावर बसलेला विद्यार्थी, कुठल्या श्रेणीतला असेल हो सुप्रियाताई?
देशात दोनच व्यक्ती सुखी आहेत आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहा असाही शेरा सुप्रियाताईंनी मारलेला आहे. त्यांच्या मते बाकी देशात कोणीही सुखी नाही. अर्थात त्यांचे दु:ख यातून लक्षात येऊ शकते. ताईंचा दादा खरेच पुणे पिंपरी चिंचवडच्या मूठभर लोकांना सुखी करू शकला असता, तर त्या दोन महानगरातील लोक दादांच्या विरोधात प्रगतीपुस्तक घेऊन मतदानाला कशाला घराबाहेर पडले असते? बाकीच्या गोष्टी सोडून द्या. दादांचे काय करायचे? त्यांनी किती वर्षे कुठल्या वर्गात काढली आहेत? कुठल्या परिक्षा दिल्या आहेत आणि किती कॉपी केली आहे? सध्या त्यांचे ‘पेपर्स’ एसीबीकडे तपासायचे पडून आहेत. त्यांनी सोडवलेली गणिते इतकी गुंतागुंतीची आहेत, की त्यांचे मॉडरेशन करण्यासाठी अखेरीस सक्तवसुली संचालनालयाला पुढे यावे लागलेले आहे. त्याविषयी ताईंना पत्ताच नसेल काय? विदर्भ किंवा अन्यत्र कुठे संवाद करायला जाण्यापुर्वी ताईंनी जरा दादाशीच संवाद केला असता, तर त्यांना उद्धव किंवा देवेंद्रापेक्षाही आपल्या दादांचे ‘पेपर्स’ कठीण गेल्याची जाणिव झाली असती ना? पण ताईंची गोष्ट वेगळी! त्या बारामतीच्या असल्याने त्यांना कधी अभ्यास करावा लागला नाही, की परिक्षा द्यावी लागलेली नाही. वर्गात बसावे लागले नाही की कॉपी करावी लागली नाही. थेट शाळेत मास्तरकीचा हुद्दा मिळू शकला आहे. बिचार्‍या देवेंद्राचे नशीब इतके कुठे होते? त्याला बालवर्गापासून प्रत्येक वर्षी अभ्यास वा परिक्षा द्यावी लागली आहे. वर्गात बसावे लागलेले आहे. त्यामुळे त्याला ‘ढ’ म्हणायची सुविधा आहे. ज्यांनी कधी अभ्यास केला नाही वा परिक्षाही दिल्या नाहीत, त्यांचे काय? जन्माला येताच ज्यांना लोकमताची गुणवत्ता आपोआप प्राप्त होते, त्यांचा वर्ग कुठला असतो ताई? नशीब देवेंद्र एकाच वर्गात बसून आहेत तीन वर्षे! म्हणून अजून मंत्रालय शाबूत आहे. दादा असते तर दुसर्‍यांदा तिथे आग लागली असती ना?
सुप्रियाताईंना जुनी शिवसेना कशी रुबाबदार होती, तेही आठवले आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु असल्याचा शोध लागला आहे. आणि यु-टर्न असतो, तेही नव्याने उमजलेले आहे. पण यु-टर्न ही पिताश्रींची ऐतिहासिक राजकीय भूमिका राहिल्याचे ताईंना अजून उमजलेले नाही. ज्या पक्षाच्या खासदार म्हणून सुप्रियाताई मिरवतात, त्या पक्षाची स्थापना कशासाठी व कोणत्या तत्वावर झाली, ते ठाऊक आहे ताई? सोनिया गांधी परदेशी जन्माच्या आहेत, म्हणून पिताश्री कॉग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. पण अवघ्या काही महिन्यात त्यांनी त्याच सोनियांशी हातमिळवणी करून राज्यातली सत्ता बळकावली होती. त्या वळणाला काय म्हणतात हो ताई? पुढे पाच वर्षांनी त्याच कॉग्रेससोबत राज्यात जागावाटप व सत्तावाटप करण्यात काकापुतण्याची दहा वर्षे गेली, त्याला कुठला टर्न म्हणतात? बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा धाक वाटायचा, कारण ते बोलतील ते कृतीतून करून दाखवत होते, असेही ताई अगत्याने सांगतात. तसे अनेक नेते आहेत देशात व राज्यात. बोले तैसा चाले, अशा नेत्यांची टंचाई नाही. मग सुप्रियाताईंना त्याचे कौतुक कशाला? पिताश्रींनी कधी बोलले ते शब्द खरे करून दाखवले नाहीत ना? विधानसभेचे निकाल लागले तेव्हा विनाविलंब भाजपाला पाठींबा दिला आणि महिनाभरात सरकार चालवणे आपली जबाबदारी नाही म्हणून झटकून टाकले. असे पिताश्री नशिबी आले, मग ताईंना बाळासाहेबांचे कौतुक वाटणे स्वाभाविकच आहे. आज वाघाची शेळी झाली असे सांगण्यापुर्वी आपल्या पक्षाची दुरावस्था कशाला झाली, त्याचेही वर्णन करायचे होते. निदान अभ्यास तरी करायचा होता. पण चावायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे असले; मग असेच व्हायचे. देवेंद्र वा उद्धव यांची फ़िकीर करू नका, सुप्रियाताई! त्या गजाआड पडलेल्या छगनरावांना बाहेर कसे काढता येईल, त्याच जरा विचार करा. बाळासाहेबांच्या त्या वाघाला पिताश्रींच्या सहवासात बळीचा बकरा का व्हावे लागले, त्याचा खुलासा केलात तर अधिक बरे होईल.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034