नेहमीच येतो मग पावसाळा..

नेहमीच येतो मग पावसाळा...
गेले २-३ दिवस वृत्तपत्रातून रोज पावसामुळे पाणी कुठे कुठे तुंबले, त्यामुळे वाहतूक व्यवस्था कशी कोलमडली, कुठे आणि किती वेळ ट्राफिक जाम झाला याची सचित्र वर्णने छापली जात आहेत. त्याचबरोबर पालिकेचे नाले सफाईचे दावे पहिल्याच पावसाने तासाभरातच कसे पोकळ ठरवले याची रसभरीत वर्णनेही वाचायला मिळतायत. मग आपोआपच रोख वळतो तो प्रशासनाची ढिलाई, भ्रष्टाचार, राजकारणी लोकांचे तोकडे ज्ञान आणि उथळ दृष्टीकोन याकडे. मग सोशल मिडीयावर येणार शिव्याशापांचा महापूर वगैरे ओघानेच आले. हे गेले काही वर्ष नित्यनेमाने पावसाळ्याबरोबर घडत आहे आणि हा पावसाळा सुद्धा त्याला अपवाद नाही. कारण आपल्या सगळ्यांना हा खेळ दर वर्षी खेळायला आवडतो. मनापासून राजकारणी आणि शासन व्यवस्थेला दोन चार शिव्या हासडल्या कि आपल्याला केवढ तरी समाधान होत. मग आपापल काम करायला आपण मोकळे!
पण किती दिवस आपण आपल्याला फसवणार आहोत? मंगळावर यान सोडणारा, सुपर कॉम्पुटर बनवू शकणारा आपला समाज एवढी साधी समस्या वर्षानुवर्षे का सोडवू शकत नाही? कारण हि समस्या तांत्रिक नाही. सामाजिक आहे. आपण सगळे या प्रश्नाकडे कसे बघतो याची हि समस्या आहे.

ओढे नाले तुंबतात का?
त्यात प्रचंड कचरा टाकला जातो.
कोण टाकतो हा कचरा? तुम्ही म्हणाल आम्ही नाही टाकत! रोज तुम्हाला असे लोक दिसतच असतील जे ओढे, नाले, नदी यांना कचरापेटी समजतात. आपण या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतो का? कचरा टाकणार्याला आजूबाजूच्या दहा जणांनी हटकलं तर किती लोकांची हिम्मत होईल तिथे कचरा टाकायची? पण कचरा टाकणार्याला आज हा पूर्ण विश्वास आहे कि कोणीही त्याला काही म्हणणार नाही. त्यामुळे हीच कचरा टाकण्याची ‘योग्य’ जागा आहे. यात फक्त झोपडपट्टीत राहणारे नाहीयेत. तर अलिशान गाड्या पुलावर थांबवून प्लास्टिकच्या पिशव्या भरभरून कचरा नदीत ‘भक्तिभावाने’ ‘विसर्जित’ करून मनापासून आपल्या कुलदैवताला नमस्कार करणारेही आहेत.

दुसरा आणखी गंभीर पण कळायला अवघड असा प्रकार म्हणजे अतिक्रमण करून बुजवलेले / वळवलेले ओढे. शहराची संपूर्ण नैसर्गिक वहन व्यवस्था (natural drainage) पूर्ण मोडकळीला येईपर्यंत या प्रकाराकडे डोळेझाक करणारे प्रशासन. ओढे / नदी काठचा इंच न इंच घशात घालायला हपापलेले बिल्डर. पण त्यांना शेवटी बळ कुठून मिळतंय? आपल्यालाच ‘सर्वात स्वस्त आणि मस्त’ डील पाहिजे ना आपल्या घरासाठी? एका इमारतीने ओढा थोडा वळवला तर एव्हढा काही फरक पडत नाही म्हणणारे आपणच आणि प्रशासनाला भ्रष्टाचारी म्हणणारेही आपणच.
नक्की कशाची वाट बघतोय आपण आपल्यात सुधारणा करण्यासाठी? काहीतरी मोठी आपत्ती कोसळण्याची? मुंबई, चेन्नई, केदारनाथ यानंतर सुद्धा आपण वाट बघणार असू तर आपण ‘वाट’ लागण्याच्याच लायकीचे आहोत.
हा प्रश्न प्रशासनाला, एखाद्या राजकीय पक्षाला किंवा एखाद्या तंत्रज्ञानाला सोडविता येईल या भ्रमातून पाहिलं बाहेर आल पाहिजे. आपली सुरक्षितता, आपला जीव, आपला वेळ, आपली मालमत्ता या सगळ्याशी हि गोष्ट जोडलेली आहे. त्यामुळे कामही आपल्यालाच करायला लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034