मध्यावधीसाठी तयार राहा! मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

ईच्छा न्यूज़:
मध्यावधीसाठी तयार राहा! मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना
शिवसेनेने सत्तेत असूनही सतत विरोधाची भूमिका घेतल्यामुळे त्यांची संगत सोडण्याच्या निर्णयापर्यंत भाजपचे नेते आले असून राज्यात डिसेंबरच्या सुमारास मध्यावधी निवडणुका घेऊन बहुमताच्या जोरावर केवळ भाजपचेच सरकार निवडून आणण्याच्या दृष्टीने या पक्षाने तयारी सुरू केली आहे. मंगळवारी रात्री या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत आता कधीही निवडणुकीसाठी तयार राहा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेची विरोधी भूमिका, विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा, शेतकरी संपामुळे राज्यात भाजपविषयीचे वातावरण आणि मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजपला कितपत यश मिळेल, अशा महत्त्वाच्या विषयांवर या वेळी चर्चा झाली, मंत्र्यांची मते मुख्यमंत्र्यांनी यावर जाणून घेतली.
शिवसेनेला सत्तेत राहायचे आणि विरोधी भूमिका घेऊन लोकांच्या मनात सहानुभूतीही निर्माण करायचे असल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय त्यांना मान्य नसून सातबारा कोरा झाला पाहिजे, असे ते म्हणत आहेत. भाजपबरोबर राहून त्यांना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची असल्याने त्यांचा हा आटापिटा सुरू असल्याचे या बैठकीत सांगितले गेले. सध्या शिवसेनेचे ६२ आमदार असून मध्यावधी निवडणुका झाल्यास त्या निम्म्यावर येतील, असे भाजपला वाटते. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या सर्व्हेनुसार भाजपची ताकद १२२ वरून १७५ ते २०० च्या आसपास जाण्याचे अंदाज खासगी पाहणीतून वर्तवण्यात आले आहेत. भाजपची वाढणारी ताकद ही शिवसेनेच्या मुळाशी येणारी असल्याने शिवसेनेच्या बागुलबुवाचा अजिबात विचार न करता मोठ्या ताकदीनिशी शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांवरही लक्ष केंद्रित करून भाजपची ताकद वाढवा, अशा सूचना फडणवीसांनी या बैठकीत दिल्याचे कळते.
भाजपने खासगी सर्व्हे करताना शिवसेनेच्या मतदारसंघांवर खास लक्ष केंद्रित केले होते. तेथील मतदार भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी काय तयारी करावी लागेल, याचा आता अभ्यास करण्यात येत असून तेथे भक्कम उमेदवार देण्यापासून ते आर्थिक ताकद तसेच मनुष्यबळ पुरवण्याचीही तयारी होत असल्याने आता मंत्री म्हणून तुम्ही कामाला लागा. पक्षाची ताकद अधिक मंत्र्यांकडून मिळणारे साहाय्य असे दुहेरी समीकरण जुळून आल्यास मध्यावधी निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यास फारसा वेळ लागणार नाही, असेही भाजपतर्फे या बैठकीत सांगण्यात आले. मध्यावधी निवडणुका लागल्यानंतर भाजपकडे येणाऱ्यांची संख्या वाढणार असून त्यात शिवसेनेचे नेतेही असतील, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपा अध्यक्ष श्री अमित शहा १६ ते १८ जून दरम्यान मुंबईत असणार आहेत.
या भेटीत भाजपा ची पुढची रणनीति नक्की ठरेल.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034