सुरेश हावरे यांच्याकडे पुन्हा ठाणे जिल्ह्याची धुरा ?

सुरेश हावरे यांच्याकडे पुन्हा ठाणे जिल्ह्याची धुरा ?
ठाणे: जिल्ह्यात भाजपकडे मातब्बर व जनाधार खेचेल असा चेहरा सध्या नाही. ठाणे शहरात आमदार संजय केळकर असले तरी जनाधार खेचण्याइतके केळकर जिल्हास्तरीय नेतृत्व नाही. खासदार कपिल पाटील हे राष्ट्रवादीतून आले असल्याने संघ परिवाराचा त्यांच्यावर फारसा विश्‍वास नाही. त्यामुळे संघ परिवाराच्या मुशीत तयार झालेल्या सुरेश हावरेंना ठाण्याच्या राजकारणात सक्रिय करण्याच्या हालचाली भाजपने सुरु केल्याची माहिती भाजपातील प्रदेश सूत्रांनी दिली.
सुरेश हावरे सध्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असून जेएनपीटीच्या विश्‍वस्तपदी भाजपने त्यांना नियुक्त केले आहे. नागपुरमधील संघ परिवारातील विश्‍वासू सदस्य अशी सुरेश हावरेंची ओळख आहे. विधान परिषद निवडणूकीत सुरेश हावरे अवघ्या 3 मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर बेलापुर विधानसभा मतदारसंघात हावरेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश नाईकांनी पराभूत केले. त्यानंतरही सुरेश हावरे ठाणे जिल्ह्यातील भाजपची सूत्रे सांभाळत होते. दरम्यान एका कायदेशीर प्रकरणात हावरेंचे नाव अडकल्याने हावरेंनी राजकारणातून काही काळ अलिप्तता पत्करली होती.
एप्रिल 2014 च्या लोकसभा निवडणूकीत केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर सुरेश हावरेंची राजकीय क्षेत्रात पुन्हा चलती सुरु झाली. त्यांना जेएनपीटीचे विश्‍वस्तपदी भाजपने नियुक्त केल्यावर काही महिन्यातच शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपने त्यांची नियुक्ती केली. भिवंडीचे खासदार कपिल पाटील, बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर अशी नावाची मांदियाळी भाजपकडे असली तरी जिल्हास्तरीय नेतृत्वाचा भाजपकडे अभाव आहे.
गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकारणात सुरू असल्या तरी त्यांच्या आगमनापूर्वी संघ परिवारातील काही घटक अंर्तगत विरोध दर्शवित आहेत. त्यातच भाजपला स्वत:च्या विशेषत: संघाच्या मुशीत तयार झालेला चेहरा ठाणे जिल्ह्याची धुरा सांभाळण्याकरिता हवा आहे. प्रदेश भाजपने त्यादृष्टीने चाचपणी केल्यावर सुरेश हावरेंच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरेश हावरे हे बांधकाम क्षेत्रातील हावरे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय सर्वेसर्वा आहेत. ठाणे जिल्ह्यात बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून सुरेश हावरे हे नाव सर्वपरिचित आहे. त्यामुळेच नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याची भाजपची सूत्रे सुरेश हावरेंकडे सोपविण्याचा निर्णय सुरेश हावरेंकडे सोपविण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नजीकच्या भविष्यात गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी त्यांना स्थानिक पातळीवर सुरेश हावरेंच्या नेतृत्वाखालीच काम करावे लागणार असल्याचे संकेत संघ परिवारातील सूत्रांकडून देण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034