अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)
काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!
१) बुफेची किंमत कशी ठरते? - साधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका. BBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns, साधारण ५०० रुपये किलो, म्हणून BBQ Nation चा मांसाहारी बुफे ७५०-८०० रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही पोटभर prawns खाल्ले तरी त्यांना नुकसान नाही.
२) वेलकम ड्रिंक, सूप चे मायाजाल - सगळ्या बुफेच्या ठिकाणी self service असली तरी welcome drink किंवा सूप मात्र तुम्हाला टेबल वर दिले जाते. त्यात तुमचे खूप काही आदरातिथ्य करायचा हेतू नसतो. गोड welcome drink ने तुमच्या मेंदूला एक छान साखरेचा डोस मिळतो आणि तुमचा मेंदू तुमची भुकेची मात्रा कमी करून टाकतो, पोट रिकामं असलं तरी. सूप तुमच्या पोटात भरपूर जागा व्यापून टाकतात आणि मग परत जास्त खायची इच्छा राहत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्यात हॉटेलवाला तुम्हाला तुमची १.५ लिटर जठरक्षमता वापरण्यापासून थांबवत असतो.
३) वेटर, एक उपद्रवी सैनिक - तुम्ही BBQ Nation मध्ये non-veg grill लावायला सांगा आणि गंमत पहा. येणारा वेटर तुम्हाला जास्तीत जास्त चिकन किंवा फिश (दोन्ही १२० रुपये किलो) खायला आणून देत जाईल. तुम्ही मटण किंवा Prawns (४५० ते ५०० रुपये किलो) कितीही मागत राहा, तुम्हाला ते अत्यंत कमी आणि खूप उशीराने दिले जाते. अपेक्षा एवढीच असते की तुम्ही भुकेच्या तडाख्यात दुसरे काहीतरी खायला घ्यावे आणि तुमचा surplus कमी करून घ्यावा. ५०० रुपये किलोच्या prawns च्या जागी तुम्ही १२० रुपये किलोचे चिकन खाल्ले तर ७५० रुपयांतले तुम्ही जास्तीत जास्त २०० रुपये वसूल करणार, बाकी हॉटेलचा फायदा.
४) चाट, आईसक्रीम - कित्येक बुफेच्या ठिकाणी चाट, पापडीवाला ठेला हमखास लावलेला असतो. बायका आपल्या नैसर्गिक स्वभावाने तिकडे जाऊन पाणीपुरी खाऊन पोट भरतात. डोक्यावरून पाणी, ५० रुपयांत एका बाईला चुरमुरे असलेली भेळ/चाट किंवा पाणीपुरी देऊन तिचे उरलेले पैसे हॉटेलवाला स्वतःकडे खेचत असतो. आईस्क्रीमची अवस्थाही तीच! स्वस्तातले फॅमिली पॅक वाले आईसक्रीम (२०० रुपये किलो) तुम्हाला नावाला डायफ्रूट शिंपडून चारायला हॉटेलवाल्याचा फायदाच असतो.
५) फळे, सॅलड - कितीही आरोग्यदायी असली तरी तुम्हाला ४० रुपये किलोचे कलिंगड, खरबूज, गाजर, काकडी चारण्याइतका आनंद हॉटेलवाला दुसऱ्या कशातच घेऊ शकत नाही. त्यामुळे हे हमखास तिथे मुबलक असणार.
६) गोडधोड/डेझर्ट - कितीही अट्टल खाणारा पाव किलोपेक्षा जास्त गोडधोड नाही खाऊ शकत, मेंदू खाऊच देत नाही. बुफेमधल्या डेझर्टच्या किमती पाहिल्या तर जास्तीत जास्त १०० रुपयांचे गोडधोड तुम्ही खाऊ शकता.
७) शाकाहारी लोक - तुम्ही समस्त बुफेवाल्यांसाठी हक्काचे बकरे असता. १० रुपये किलोचा बटाटा "तंदूर आलू" म्हणून तुम्हाला खाताना पाहून हॉटेलवाले मनसोक्त आनंद घेत असतात. पनीर खा, स्वीट खा, फळे खा ... काहीही खा! तुमच्यासाठी हॉटेलवाला ३००-३५० च्या वर काहीही खर्चत नाही, आणि तुम्ही ७०० रुपये दक्षिणा देऊन येता.
तेव्हा खवय्यांनो, बुफेचा पैसा खऱ्या अर्थाने वसूल करायचा असेल तर फक्त महागातले अन्न, पोटभर खाऊन यावे. आणि तुम्हाला जर फक्त हौसेसाठीच बुफे खायचं असेल तर मग ५० रुपयांचे चाट खाऊन ८०० रुपये देऊन या... कुणाचं काहीही जात नाही!
- डॉ. विनय काटे
Comments
Post a Comment