When will TMT improve its service ?

 ALERT CITIZENS FORUM OF INDIA
डिसेंबर १४, २०१५
मा. आयुक्त साहेब,
ठाणे महानगर पालिका,
ठाणे.
महोदय,
ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराबद्दल आम्ही आपल्याला आधी पण लिहिले आहे.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणेकरांना आधुनिक ठाण्याचे भव्य स्वप्न दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेची रडतखडत सुरू असलेली परिवहन सेवा दीर्घकाळ झाला, पंक्चर असूनही त्यात हवा भरण्याचे काम नेमके कधी करणार, हा ठाणेकरांचा मुख्य प्रश्न आहे.
रेल्वेच्या विस्ताराला असलेल्या मर्यादा, वाहतुकीच्या पर्यायी मार्गांना राजकारणातून घातलेला खोडा, रिक्षा संघटनांतील राजकीय हस्तक्षेप यामळे ठाणे शहराच्या वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहेत. त्यात पालिकेची परिवहन सेवा हा आधार ठरण्यापेक्षा मन:स्तापाचे कारण होते आहे.
परिवहनच्या ताफ्यात 300 बस असतांनाही सध्या अवघ्या 120 च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. दुरूस्ती-देखभालीसाठी निम्म्याहून अधिक म्हणजे 175 बस ठिकठिकाणच्या आगारात पडून आहेत. बेभरवशी सेवेमुळे दिवसेंदिवस प्रवासी घटत आहेत. परिवहन सेवेचे उत्पन्नही तीन लाखांनी घटले आहे. काही मार्गावर तर प्रवाशांना अर्धा-अर्धा तास बसची वाट पाहावी लागत आहे. नव्या बसचे दिवास्वप्न मागील तीन वर्षापासून ठाणेकरांना दाखविले जात आहे. परंतु आजही या बस परिवहनमध्ये दाखल होऊ शकलेल्या नाहीत.
१९८९ मध्ये ठाणे परिवहन सेवा सुरु झाली. सुरवातीला ५० बस या सेवेत होत्या. टप्याटप्याने बस वाढत गेल्या. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असून, त्यामध्ये २५०० कर्मचारी काम करीत आहेत. मुंबईप्रमाणे बेस्ट होणे सोडा, पण टीएमटीच्या मागून सुरु झालेल्या नवी मुंबई, वसई विरार महापालिकेच्या सेवांनी ठाणे काबीज केले असतांनाही वेगवेगळे प्रयत्न करूनही परिवहन सेवा कात टाकू शकलेली नाही. परिवहनच्या वागळे आगारात ७५ हून अधिक बस टायर बदलणे, ट्यूब बदलणे, तुटलेल्या काचा, खराब आसने, टीपीएस केबल टाकणे अशा कराणांसाठी धूळ खात पडल्या आहेत.
यापूर्वीचे फसलेले प्रयोग
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाहतूक कशी सुधारता येईल, यासाठी पालिकेने कोट्यवधींची उधळपट्टी करुन ठाणेकरांना अनेक दिवास्वप्ने दाखविली. ते सर्वच प्रयोग फसले. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी रिंंग रुटची संकल्पना पुढे आणली होती.
त्याचे मार्ग अंतिम झाले, कुठे-कितीबांधकामे बाधित होतील, ते निश्चित झाले. त्याचा खर्च काढण्यात आला. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेच नाही. त्यानंतर बीआरटीएसची संकल्पनाही काही वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने पुढे आणली. त्याचेही मार्ग, खर्च आदींसह सल्लागार नेमून ही सेवा कशी असेल याचाही आराखडा तयार झाला.
परंतु तत्कालीन आयुक्त आर. . राजीव यांनी लाईट रेल ट्रान्सपोर्टची संकल्पना पुढे आणली आणि ठाणेकरांना या ट्रेनच्या सुखद प्रवासाचा आल्हाददायी आनंद दिला. त्यामुळे बीआरटीएसची संकल्पना बासनात गुंडाळली गेली.
केवळ १८ महिन्यात ही सेवा ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तीन वर्षे उलटूनही ही सेवा कागदावरुन पुढे सरकलेली नाही. या तिन्ही स्वप्नांच्या पाहणी-आराखड्यासाठीच पालिकेने कोट्यवधींची उधळपट्टी केली.
आयुष्य संपलेल्या बस रस्त्यावर
ताफ्यातील बसची संख्या कमी असल्याने आयुर्मान संपलेल्या १५ ते २० बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत. किरकोळ दुरुस्ती केल्यास नव्या बस सहज रस्त्यावर उतरू शकतात. मात्र वागळे आगारात त्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर उतरवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे काम मात्र परिवहन करीत आहेत.
उत्पन्न आणि प्रवाशांत घट
परिवहन सेवेच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर सुरूवातीचे काही महिने टीएमटीला दिवसाला २६ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळत होते. सध्या हेच उत्पन्न २२ ते २३ लाखांवर आले आहे. तसेच प्रवाशांची संख्याही लाखाने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्या १९० बस कधी येणार?
टीएमटी सुधारण्यासाठी पालिकेने जेएनएनयुआरएमअंतर्गत २३० नव्या बस घेण्याचे ठरविले होते. त्यातील ४० एसी बस दाखल झाल्या, उरलेल्या १९० बसचा मार्ग तीन वर्षापासून रखडला आहे. या बस उभ्या
 करण्यासाठी जागा नसल्याचे कारण परिवहन प्रशासन देत आहे. या बस खाजगी ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार असून त्यावर फक्त वाहक परिवहनचा असेल. त्यातून किलोमीटरमागे परिवहनला उत्पन्न मिळेल. पण या बस दाखल होऊ शकलेल्या नाहीत. नव्या वर्षात बस दाखल होतील, असे नवे आश्वासन सध्या मिळते आहे.
जलवाहतूक प्रत्यक्षात येणार?
रस्त्यावरील सार्वजनिक वाहतुकीची सेवा कागदावर राहिल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जल वाहतुकीचा पर्याय दाखविला. वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जलवाहतुकीची सेवा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
१०० इलेक्ट्रिक बसचे स्वप्न :
मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना स्मार्ट बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १०० पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची संकल्पना पुढे आणली आहे. या बस पीपीपी तत्वावर चालविल्या जाणार आहेत. ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार अधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावर या बस धावतील
मात्र हे सर्वे कधी कसे होणार याची माहिती कोणीही देत नाही. ठाणेकर जनता आपली रोज हाल - अपेष्टा सहन करत आपले आयुष्य कंठत आहे.
या विषयावर नागरिकांशी संवाद साधून काहीतरी तोडगा काढावा हि एक विनंती. आमच्या सारख्या संस्था महापालिकेला मदत करायला तयार आहेत. मात्र पहिली पहल पालिकेने करायला हवी.
आयुक्तसाहेब, आपण या विषयावर गंभीर पणे विचार करून जनतेला राहत मिळवून द्यावी हि विनंती.
आपला सहकारयेच्छुक,
अलर्ट सिटिझन्स फोरम ऑफ इंडिया साठी,
दयानंद नेने
अध्यक्ष.


Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained