तुही यत्ता कंची ??
तुही यत्ता कंची ??
पंतप्रधान नरेंद्र मोदी
शैक्षणिक गुणवत्तेवरून वादळ उठवण्याचे हिणकस प्रयत्न सध्या सुरु झाले आहेत.या माणसाला आपण पहिले गुजरात दंगलीत बदनाम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला .नंतर मौत का सौदागर ठरवून राजकीय आयुष्यातून उठवण्याचा चँग बांधला.निर्लज्जपणे त्याच वैयक्तिक कौटुंबिक जीवन चव्हाट्यावर आणण्याचे अश्लाघ्य प्रयत्न केले. तरीही जनतेने पूर्ण बहूमताने त्याला दिल्लीचे तख्त बहाल केले हे जिव्हारी लागलेल्या मंडळीना त्याच प्रधानमंत्री असणं हेच अवघड जागेच्या दुखण्यासारखं झालय.आम्ही तुला तिथे सहनच करू शकत नाही हे सत्य सांगण्याची हिंमत नसणाऱ्या दिवाभीतांनी नंतर जीवाचे रान करून असहिष्णुता सारख्या बालिश मुद्द्यावर देश पेटवण्याचा प्रयत्न केला. तरीही हा माणूस आणि याचं सरकार दिवसेंदिवस लोकप्रियच होत आहे हे या वास्तवाने नाउमेद झालेल्या नतदृष्टां नी मग विदेश यात्रांपासून तर अंगावरच्या सुटपर्यंत गदारोळ उठवला.भ्रष्टाचार किवा अन्य कशातच तो सापडत नाही याचे वैफल्य येऊन अखेर देशद्रोहाचे समर्थन करण्याइतपत कमरचे लज्जावस्त्र बाजूला काढून ठेवले...आणि आता नवीन प्रश्न ते प्रधानमंत्रयांना विचारित आहेत "तुही यत्ता कंची" ??
पंतप्रधानांची "यत्ता" दाखवणारी एक छोटीशी बातमी परवा झळकली. प्रधानमंत्र्यांच्या विदेश वा-यांवर अमाप टीका करणा-या आणि जणू हे प्रवास म्हणजे देशाची उधळपट्टी आहे अशा थाटात किंचाळणा-या सर्वांचा मुखभंग करणारी आणि त्यांची "यत्ता " ,गुणवत्ता दाखविणारी .नुकत्याच झालेल्या आपल्या विदेश प्रवासात प्रधानमंत्री मोदी यांनी तीन रात्रींचा विश्राम विमानातच केला. महागड्या हॉटेल्ससाठी होणारा सरकारी खर्च वाचावा, प्रवासाचा कालावधीचा वेळ वाचवावा यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला. प्रधानमंत्र्यांच्या प्रवासात त्यांचे कार्यालय सोबतच असते. या प्रवासातील एकही क्षण आराम किंवा चैनीसाठी वाया न घालवता दिवसरात्र आपला क्षण न क्षण प्रधानमंत्री देशासाठी कसा झिजवीत आहेत याचे वर्णन या बातमीत होते. कोणत्याच वाहिन्यांना आणि माध्यम पंडितांना या घटनेची दखल घ्यावीसी वाटली नाही. मात्र सर्वसामान्यांसाठी शिळाणलेल्या आकाशात एखादा उन्हाचा कवडसा लाभावा असे हे वृत्त आहे.त्यांना हवा असलेला राजा त्यांना लाभलाय याचे अपार समाधान देणारा हा शुभसंकेत आहे.
मोदींच्या कार्यशैलीवर, राजकारणावर, उपलब्धींवर, यश-अपयशावर चर्चा होत राहील, व्हावीही. कारण विधायक समीक्षा, विरोध हा लोकतंत्राचा प्राण असतो. सर्वंकष राजा ही भारतीय समाज जीवनातील संकल्पना नाहीच. राजाला ईश्वरी अवतार
मानणा-या पश्चिमेची ती देण आहे. आपल्याकडे मात्र राजाला कधीही अदंड्य मानलेले नाही. ईश्वराचा अवतार तर दूरच.राजाला दंड देण्याचा अधिकार रानावनात तापस जीवन जगणा-या ऋषीमुनींनी असे.आज राजाची समीक्षा करण्याचा, दंड देण्याचा अधिकार दर पाच वर्षांनी सार्वभौम जनता वापरत असते. पाच वर्षांनी मोदींच्या कारकिर्दीचा निकाल जनता लावेलच. पण तत्पूर्वी ज्या वेगळ्या राजकीय संस्कृतीचं बीज या छोट्या बातमीत दडलं आहे हे समजून घेतलं पाहिजे.
सत्ता का? आणि कशासाठी या प्रश्नाचे उत्तर प्राचीन भारतीय समाजधारणेने सुस्पष्ट दिलेले आहे.राज्य नावाच्या संस्थेचे राष्ट्र जीवनात नेमके स्थान काय याचीही चर्चा विस्ताराने आपल्याकडे झालेली आहे.जनतेसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारा सम्राट रंतीदेव म्हणतो
न त्वहम् कामये राज्यम्
न स्वर्गम् न पूनर्भवम्
कामये दुःखतप्तानाम्
प्राणीनाम् आर्तीनाशनाम्
"मला स्वर्ग नको राजोपभोग नकोत,माझ्या प्रजेचे कष्ट निवारण हाच माझा जीवनोद्देश."
मिळालेले राज्य अशा विश्वस्त भावनेने स्वतः कोणतेही सुखोपभोग न घेता जगण्यारे प्रजेसाठी तीळ तीळ झटण्यारे राजेच इतिहास घडवतात. महंमद पैगंबरांच्या आयुष्यातील एक घटना फारच उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनध्येयासाठी लढतांना पैगंबर साहेबांना अनेक लढाया लढाव्या लागल्या.मात्र त्यांचे व्यक्तिगत जीवन अत्यंत साधेपणाचे, अभावग्रस्त असेच असायचे. कारण लढाई जिंकली तरी प्राप्त ऐवज ते स्वत:साठी ठेवीत नसत. सरदारांना वाटून देत.स्वाभाविक घरात असंतोष असे.एकदा लढाईत मोठा विजय प्राप्त झाला. तेंव्हा त्यांच्या सा-या राण्यांनी यावेळी आवडीचे काहीतरी पतीला मागायचेच असा चंग बांधला. सा-यांचे नेतृत्व प्रिय पत्नी आयेशाने केले. "आम्ही आजवर काहीच अभिलाषा धरली नाही. यावेळी मात्र मिळालेल्या लुटीतून तुम्ही आपल्यासाठी काही ठेवावं "असा आग्रह तिने धरला. पैगंबर साहेबांनी यावर दिलेले उत्तर तमाम राजकारण्यांनी, सत्ताधिष्ठीतांनी आणि सत्तातुराणांनीही लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणाले ‘‘एवढंच, हरकत नाही. काय हव असे ते ठेवून घ्या. फक्त लक्षात ठेवा ज्याक्षणी हा हव्यास तुम्ही कराल त्या क्षणी माझी पत्नी म्हणवून घेण्याचा अधिकार तुम्ही गमावाल.’’
एवढ्या उच्च नैतिक मुल्यांनी जगणारं नेतृत्वच मन्वंतर घडवू शकत. नवयुग साकारू शकतं. या साºया पार्श्वभूमीवर आमच्या आजच्या राजकारणाची काय स्थिती आहे? वैचारिक मतभेद, विचारधारांचा संघर्ष चालत राहील. पण प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात साधनशुचितेचे, नैतिकतेचे जे धिंडवडे आपल्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वांनी उडवले आहेत ती देशासमोरची सर्वात भयावह शोकांतिका आहे. पाच वर्षांच्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत सात पिढ्यांची सोय करणाºया नेतृत्वाकडून समाजाने काय अपेक्षा धरायची? आजच्या वर्तमानपत्रात समाजवादी बिरूद धारण करणाºया उत्तरप्रदेशातील एका नेत्याच्या कु टूंबातील सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. एका घरात पाच खासदार, एक मुख्यमंत्री, ३ मंत्री, ५ विधायक, ५ स्थानिक संस्था पदाधिकारी असे सत्तेचे कौटुंबिकीकरण समोर आले आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता या चक्रात भरडून निघते आहे ती मात्र सामान्य जनता. गेल्या सत्तर वर्षात एक विकृत राजकीय संस्कृती देशात विकसिल झाली. ‘‘लुटीचे’ नवे अर्थशास्त्र नेतृत्वानेच सामान्य माणसाला शिकवले. भ्रष्टाचार किंवा आणीबाणीपेक्षाही लोकशाहीच्या दृष्टीने जास्त भयानक पाप काँग्रेस पक्षाने केले ते या विकृत राजकीय संस्कृतीच्या विकसनाचे. आपल्या लोकशाहीच्या या मुलभूत वैगुण्यावर कधीतरी मंथन व्हायलाच हवे. कारण त्यामुळे सर्वच राजकीय व्यवस्थेवर आणि नेतृत्वावर अविश्वास असणारा एक खूप मोठा जाणता मतदार देशात तयार होतो आहे.राजकीय प्रक्रिये पासून दुरावत जाणार हा जाणता वर्ग हे लोकशाहीपुढचे मोठे संकट आहे.
म्हणूनच विमानात झोपणारा प्रधानमंत्री आम्हाला अप्रूप वाटतो. लग्नसमारंभात सामान्य माणसासारखे रांगेत उभे राहून जेवणारे,कॉलेज मधील शिक्षकाला वाकून नमस्कार करणारे संरक्षणमंत्री बातमीचा विषय बनतात. विमानतळावर सर्वसामान्य माणसांच्या रांगेत उभे राहून सुरक्षा तपासणी करून घेणाºया नितीन गडकरींचा फोटो कौतुकाने सोशल मिडियावर व्हायरल होतो. या साºया गोष्टींचे कौतुक करणारे सारे संघ वा भाजप समर्थक असतातच असे नाही. राजकीय विचारधारांच्या पल्याड एका चांगल्या राजकीय नेतृत्वाची व त्या आधारे एका चांगल्या राजकीय संस्कृतीची आस असणारी ही सामान्य माणसे असतात.
गेल्या सत्तर वर्षातील घाणींनं बरबटलेली लक्तरं धुवून काढून एका वेगळ्या राजकीय संस्कृतीची पायाभरणी करणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे.
प्रधानमंत्री मोदींची ही कृती अशा नव्या राजयज्ञाचे,राजकीय संस्कृतीचे पुण्याहवाचन आहे. सकाळी ४ ते रात्री १ देशासाठी कणकण झिजणारा, राजभवनातही भूमीशय्या(जमिनीवर झोपणे) करणारा, स्वत:च्या नातेवाईकांना सत्तेच्या उंबरठयालाही स्पर्श न करू देणारा, स्वच्छ चारित्र्याचा अतिशय संयमित कर्णधार त्यांच्या रुपाने देशाला लाभलाय हा शुभयोग आहे. आणि म्हणून सामान्य माणूस मोदींच्या पाठीशी आहे.
मोदींची यत्ता विचारणाऱयांना कसे कळणार की खुद्द प्रधानमंत्र्याची आई आपल्या गावातील सार्वजनिक रुग्णालयात सामान्य व्यक्तिप्रमाणे उपचार घेते आहे.ही त्याची यत्ता आहे.
त्याचा सख्खा भाऊ गावात रेशनचे दुकान चालवतो आहे.ही त्याची यत्ता आहे.
एखाद्या वयोवृद्ध व्यक्तिला स्वत: प्रधानमंत्री वाकून नमस्कार करतात ही त्यांची यत्ता आहे.
१९६५ च्या युद्धातील वीर सैनिकाला स्वहस्ते चहाचा कप नेऊन देतात ही त्यांची यत्ता आहे
आणि हे सारे सहज, स्वाभाविकपणे घडते आहे याचे कारण हे प्रधानमंत्री वेगळ्या राजकीय संस्कृतीचे आहेत. स्वत:चे कपडे विदेशातून धुवून आणणाºया राजकीय संस्कृतीची जागा स्वत:ला प्रधानसेवक म्हणवणाºया, स्वत:चे कपडे स्वत: धुणाºया नव्या राजकीय नितीमत्तेने आणि चारित्रयाने घेतली जात असेल तर त्याचे सर्व वैचारिक मतभेदापल्याड जावून स्वागतच करायला हवे.
गुजरात दंगलींपासून तर अगदी अंगावरच्या सुटापर्यंत अत्यंत खोट्या अपप्रचाराला, अश्लाघ्य भाषेतील टीकेला सामोरा जाणारा हा नेता आपल्यावरील सर्व आरोपांना केवळ कृतीने उत्तर देतो. कितीही खालच्या भाषेतील आक्रमणावर एकही वावगा शब्द तोंडातून न काढता विलक्षण संयमाने परिस्थितीला सामोरा जातो. अत्यंत कठोरपणे भ्रष्टाचाराविरोधात योजनाबद्ध कृती योजना सुरू करतो. त्यांची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढतच जाते. मग त्याला कोणत्याच जाळ्यात अडकवता येत नाही या वैफल्याने असष्णुतेपासून तर देशभक्तीच्या व्याख्येपर्यंतचे सारे विवाद उभे केले जातात. सामान्य माणसांच्या जगण्याशी सुतराम संबंध नसणाºया विषयांवर बुद्धीजीवी चर्चांचे रान उठवतात. जातीय,प्रांतीय अस्मितांना भडकवण्याचा संघटित प्रयत्न होतो. आणि सर्वात मोठा विनोद म्हणजे या नेतृत्वाच्या भव्यतेसमोर आपल्या खुजेपणाने ओशाळलेले सर्वपक्षीय राजकीय धुरीण मग हतबलतेनं आपली आयुष्यभराची राजकीय तपस्या विनयभंगाचा आरोप असणा-या एका उथळ पोरकट बुजगावण्याच्या पायाशी समर्पित करून त्याचे भोई बनण्यासाठी पुढे सरसावतात. एका पोरकटामागे फरफटत जाणं हा त्यांचा केविलवाणा पराभव असतो.या सर्व वादळात तो मात्र शांत असतो. चकार शब्दातही कशाचा प्रतिवाद करीत नाही. विषवमनाच्या वांत्या स्थितप्रज्ञतेने सहन करतो. कारण सत्तेच्या राजकारणाच्या पलीकडे असणाºया विशाल राजकीय समाजधारणेचं त्याचं भान शाबूत असतं.
महाभारतातल्या भीष्मांच्या तोंडी राजकारणातलं एक शाश्वत सत्य प्रकट झालंय."राजा कालस्य कारणम्"
समाजाच्या चांगल्या वाईट जीवनाची यत्ता राजाच्या यत्ते वरून ठरत असते..आजही कानात प्राण आणून त्याची मन कि बात ऐकणार्या सामान्य भारतीयाला त्याच्यावरील वातानुकूलित समीक्षेत रस नसतो..कारण राजकारण अर्थकारणाचे शब्दजंबाळ वांझोटे विश्लेषण कळत नसलं तरी एक मात्र त्याला कळत असतं माझा राजा प्रामाणिक आहे आणि हीच त्याची यत्ता आहे.
Comments
Post a Comment