Raigad village shows the way to overcome water shortage

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात चिरगाव बागेचीवाडी येथील ''वाहते पाणी'' ठरतेय पाणीटंचाईवर मार्गदर्शक



'चोवीस तास पाणी' म्हणजे मुंबई पुणे येथील 2बीएचकेच्या विक्रीकरता गि-हाईक मिळावा यासाठी जाहीरातीत असणारी ठळक गोष्ट. प्रत्यक्षात मात्र फेब्रुवारी-मार्च महिन्यातच हे पाणी कमी व्हायला लागतं. पण रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावात चोवीस तास पाणी अगदी बारामहिने वापरायला मिळते. हे पाणी कसे मिळते व का मिळते याचा अभ्यास करण्यासाठी चिरगाव येथे जाऊन पाहणी केली तर प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न सुटेल यात शंका नाही.
म्हसळा शहराकडे जाताना देहेन, भापट या जंगलाच्या कुशीत चिरगाव बागेची वाडी वसली आहे, या गावाकडे जाण्याकरीता भापटहून एक मार्ग आहे. पण गावात जाण्याकरीता अर्धाकिलोमीटर चालत जावे लागते. तर दुस-या मार्गाने थेट चिरगाव बागेच्या वाडीत गाडीने जाता येते. याकरीता म्हसळा शहराचे अगोदर सावर गावाच्या डावीकडून नदीचा पूल ओलांडून सरळ जंगलाचा मार्ग पकडावा लागतो. कच्चा रस्ता आहे पण गाडी देखील सहज जाते. गावात शिरतानाच आपले स्वागत करते ते पाण्याचा अखंड स्त्रोत. जणू काय निसर्गच आपली ओंजळ भरून आपल्याला अर्ध्य देत असल्याचा भास होतो. डोंगरातून येणारे पाणी बागेच्या वाडीकरता एका टाकीत साठवले जाते आणि ओसंडून पून्हा ते पाणी वाहत असते. या पाण्याचा उगम एका धबधब्यापासून होतो जंगलात असल्याने सहज दिसत नाही. तेथून भेकराचा कोंड व पुढे एका छोट्या तलावातून उताराने बागेची वाडी, सडकेची वाडी, बौद्धवाडी, सावर अशा वाड्यांवर पाईपाद्वारे विनावीज पाणी फिरविले जाते. शिवाय कितीतरी पाणी वाहून ते नदीलाही जाऊन मिळते. हे पाणी कोणत्याही योजनेतून आलेले नसून ही सारी निसर्गाला जपल्याबद्दलची निसर्गाने मानवाला दिलेली परतफेड आहे.
तसं पाहिलं तर देहेनचं जंगल येथे हा पाण्याचा मोठा साठाच आहे. या पट्ट्यातील वांगणीचं पाणी, देहेनयेथील काही पाण्याचे टाक, खामगांव रहाट, भापट फाट्यावरील पाण्याचा साठा, देहेनच्या उताराखालील चिखलप येथील पाणी, देहेनचे दत्तमंदिर शेजारील पाण्याचासाठा ही या जंगलातील सहजपणे दिसणारे पाण्याचे साठे आहेत. भौगोलिक दृष्ट्या पाहिल तर भापट परिसर डोंगरातील किंचीतसा खोलगट भाग आहे. इथेच पावसाचे पाणी नैसर्गीक दृष्ट्या जमा होते आणि स्थानिक वृक्षांच्या सहाय्याने ते पाणी धरून ठेवले जाते. जांभूळ, लोखंडी, पडदाखोड, सातवीण, आंबा, हिरडा, अंजन अशा 217 प्रकारचे वृक्ष हे पाणी धरून ठेवण्यात मदत करतात आणि ही 217 प्रकारची वृक्ष या देहेन ते सावर परिसरात दिसून येतात. त्याशिवाय बहावा, जस्मीन, अर्जुन, पांगारा, कवशी, शिवण, वाकावरीची वेल, वाघाटी, सागरगोटा, भेंडशेत, गुळवेल अशी पन्नासहून अधिक उन्हाळ्यात फुले देणारी झाडे येथे दिसून येतात. चिरगाव बागेची वाडी येथील हे वाहते पाणी हे या निसर्गातील जैवविविधतेचं एक देणं आहे.
विशेषत: चिरगाव बागेची वाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी या वनांचे खूप रक्षण केले आहे. सध्या भापटच्या पठारावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत आहे. त्यामुळे चिरगाव बागेची वाडी येथील जंगलातील धबधब्यातून पडणार्या पाण्याची रुंदी वर्षोनुवर्षे कमी होत आहे. त्यामुळे वनखात्याबरोबर देहेन, भापट परिसरातील पठारावरील ग्रामस्थांनी ही वृक्षतोड थांबविली पाहिजे किंवा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संगोपन करायला पाहिजे. मूळात चिरगाव बागेची वाडी येथील 31.21 हेक्टर क्षेत्रफळ असलेले हे जंगल देवरहाटीचं असल्याने व येथे देवीचे मंदिर असल्याने येथे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही. ही देवराईची पद्धत येथील ग्रामस्थांनी अजूनही जपली आहे. येथील दिडशेहून पक्षांच्या रक्षणाच्यादृष्टीने त्यांना त्रास होऊ नये म्हणून कोणताही कार्यक्रम असला तरी या गावात स्पीकर लावला जात नाही. इथे सध्या महाडच्या सिस्केप संस्थेद्वारे गिधाड संवर्धनाची चळवळ ही याच ग्रामस्थांच्या सहकार्याने चालविली जात आहे. गिधाड संवर्धनाबरोबर येथील जंगल सफर करून नवीन पिढीसमोर निसर्गामुळे आपल्याला पाणी कसे मिळते हे दाखविण्याचा व समजून देण्याचा प्रयत्न सिस्केप संस्थेद्वारे केले जात आहे.
रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आता जाणवू लागले आहे. ही दुर्दैवी पाणी टंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल आणि टँकरचा आधार घेतला जात आहे पण हा उपाय अगदीच तोकडा आहे. पाणी साठविण्यासाठी बंधारे व स्थानिक वृक्ष लागवडीचे आवाहन केले गेले तर हा दूरगामी उपाय ठरू शकतो. पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. चिरगाव बागेची वाडी येथील पूर्वजांनी देवरहाटीच्या माध्यमातून पर्यावरणाचे खूप मोठे काम केले आहे. त्याचा फायदा आज येथील लोकांना होत आहे. इतरत्र दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवली असताना चिरगाव बागेची वाडीत मात्र 24 तास पाणी मिळते हा दूरगामी परिणाम आज चमत्कारच ठरत आहे. या गावाला भेट देऊन तशीच वनराई, स्थानिक वृक्षांची लागवड करून आपल्या कितीतरी पिढ्यांना भरपूर पाणी मिळेल असा दूरगामी निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे. हे पाणी नियोजन पाहण्यासाठी चिरगावबागेची वाडीत जरूर या आणि हा सर्व निर्सगाचा चमत्कार कसा घडतो ते त्या गावचे माजी सरपंच किशोर घुलघुले यांच्याकडून आपण ऐकाच. ही चिरगाव बागेची वाडी पाणीटंचाईग्रस्त गावांना खरंच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
💧जागर पाण्याचा निर्सगाच्या रक्षणाचा💧
🙏​💧🙏​💧🙏​💧🙏​💧🙏​

Comments