Enough is enough....Mr. Raj Thackeray
राजसाहेब वाsss बहुत क्रांतिकारी...!!
महाराष्ट्रात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर वक्तृत्वकलेत आणि सभा रंगविण्यात आपला हात कुणीही पकडू शकणार नाही, हे तर मान्यच केले पाहिजे...
पण...पण...पण आपल्या उक्तीच्या तुलनेत आपली कृती म्हणजे भलामोठा भोपळा आहे...
गेल्या १० वर्षातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने २,३ महाराष्ट्रदर्शन सहली वगळता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यापलीकडचा महाराष्ट्र तुम्ही कधी पाहिलाय का...??
शेतकरी आणि सोयाबीन तर सोडाच, कधी सोयाबीन तेल तरी खाल्लंय का...??
कुणावर टीका करताय तुम्ही?? देवेंद्र फडणवीसांवर??
देवेंद्र फडणवीस हे कुठच्या रिमोट कंट्रोलने मुख्यमंत्री बनलेला गल्लीतील गावगुंड नाही. देवेंद्र फडणवीस हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत गत विधानसभेच्या निवडणूकपूर्व झालेल्या विविध सर्वेत तुमच्यासकट अनेक दिग्गजांना बाजूला सारत ४०% हुन अधिक पसंती मिळविणारे लोकस्वीकृत आणि लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत...
त्यामुळे गत वर्षात "कृष्णकुंज" ते "शिवतीर्थ/शिवाजी पार्क" एवढाच काय तो शे दोनशे मिटर्सचा प्रवास करणारे माननीय राज ठाकरे साहेब,
जलयुक्त शिवारची कामे असो, दुष्काळग्रस्त भागांचे दौरे असो...
लंडन ते थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या पर्यंत...
किंवा अगदी काल परवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले "मेक इन महाराष्ट्र"चे व्यासपीठ असो...
महाराष्ट्रातील कोपरा न कोपरा पिंजून काढत, महत्वाकांक्षी योजनांचे स्वतः मॉनिटरिंग करत वणवण फिरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेण्यापूर्वी,
राज ठाकरे साहेब, आपण जरा आरशात स्वतःचे कर्तृत्व न्याहळले पाहिजे...
१५ वर्षे सत्ता भोगत काँग्रेस-राष्ट्रवादीने रिकामी केलेली राज्याची तिजोरी...
राज्यात गत चार वर्षांपासून सततचा भीषण दुष्काळ, गारपीट, नापिकी, सिंचनाअभावी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
भीषण पाणी टंचाई...
मागील सत्ताधाऱ्यांनी खाऊन टाकलेल्या सहकारी बँका, बुडवलेली सहकारी कारखानदारी...
उद्योग-धंद्या अभावी नोकरीसाठी वणवण फिरणारे विदर्भ-मराठवाड्यातील तरुण...
गत १५ वर्षातील भ्रष्ट शासनामुळे मग्रूर झालेली नोकरशाही...
मंत्रीपदे, महामंडळ, सत्तेतील वाटा यासाठी रुसून बसलेले मित्रपक्ष...
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हातात घेतली, तेव्हापासून ते सतत सर्व आघाड्यांवर अतिशय जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे काम करताहेत...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकाच वर्षात तब्बल २५००० कोटींची तरतूद करणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत...
राजसाहेब, ३३००० विहिरी एका रात्रीत बनत नसतात. मूल जन्माला यायला सुद्धा ९ महिने प्रतीक्षा करावी लागते...
आपण या उन्हाळ्यात फक्त तासभर उन्हात उभे राहून किमान ३-४ विहिरींच्या कामाची पाहणी करून दाखवा, या जरा विदर्भातील ऊन खायला, एक दिवस जरी उन्हात फिरलात तर पुढच्या पाडव्यापर्यंत तुम्ही कृष्णकुंजच्या बाहेर पडणार नाही याची मी शाश्वती देतो...
घरबसल्या टीका करणे सोपे असते राजसाहेब...
अनेक आव्हानांना तोंड देत प्रत्यक्ष राज्याचा गाडा ओढणे आणि आक्रमक भाषण करणे यातला फरक तुम्हीच नाशिक मनपाच्या निमित्ताने मराठी माणसाला पटवून दिलाय, बहुत काय बोलणे...!!
सभांमध्ये प्रक्षोभक भाषणे करून तरुणांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांना रोजगार मिळवा यासाठी धडपडणारा एक सुसंकृत, प्रामाणिक आणि मेहनती तरुण मुख्यमंत्री हा आजच्या युवापिढीला तुमच्याहून अधिक आवडतो...
दरवर्षी तीच चाल, तेच शब्द, तोच राग आळविल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशाची नवी क्षितिजे गाठणाऱ्या मराठी माणसाला आता तुमचा अक्षरश: वीट आलाय...
भरल्या पोटी निवडणुका तोंडावर आल्या की जीन्स-टीशर्ट उतरवून पांढरा कुर्ता-पायजमा घालून भाषणे ठोकायची, कार्यकर्त्यांना गुर-ढोरांप्रमाणे राबवायचे, पदरात काही पडले तर ठीक, अन्यथा पुन्हा बिळात लपून बसायचे, हा उद्योग आणखी किती वर्ष करणार आहात राजसाहेब...??
उसने अवसान आणून पोकळ डरकाळ्या फोडण्यापेक्षा काहीतरी करून दाखवा...
खळ्ळफटॅक करून सरकार चालवता येत नसते...
- तीच ती घिसीपीटी टेप ऐकून वीट आलेला उद्यमी मराठी तरुण !
Comments
Post a Comment