How to introspect oneself ?
स्वतःला उलगडून पहाताना
काय काय वाचायचं आणि काय काय ऐकायचं ना?
ह्या सगळ्या गडबडीत आपला आपल्याशी संवाद व्हायचा तो राहून जातो. गोळा बेरीज करता करता एखादी मूळ गोष्ट हरवावी तशीच. एका बाजूला एकात्म म्हणायचं नुसतं आणि बाकी सगळा वेळ आपण कसे वेगळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी घालायचा. आपण आपला अस्तित्व समजून घ्यायला सुरुवात केली कधी ना कधी शून्याकार येणार असतो. पण तो कदाचित नको असतो आपल्याला.
आपल्यालाच देव कसा भेटला ह्यातच समाधान मानणारे आपण. येथेही खाडाखोड केल्याशिवाय आपण काही एकमेंकांना सामोरे जात नाही. अंशातला अंश शिल्लक ठेवण्यात यथार्तता वाटते. निराकारपण आकारात बदलावा असे वाटत रहावे. दिसू शकणारे दृष्टी लाभलेले बाकी सगळे कसे आंधळे ह्याचा प्रमेय मांडण्याची धडपड काही सुटत नाही.
आपलं पाहणं पडताळून घ्यावं अगदी अनुभवाच्या कसोटीवर तोलून मापून घ्यावं. शेवटी आपल्यात होणारा बदल आपल्यालाच जाणवावं इतकं पाहणं आपल्याला शक्य आहे म्हणा. ह्याच्या पलीकडे पहायला कदाचित अजून काही प्रयत्न करावे लागतील. एकदा खोलात शिरलं की जाणवायला सुरवात होते. आपल्या मनात असलेला आकार सूक्ष्म होत जातो.
काय जग आहे ना एका बाजूला सूक्ष्म गोष्ट मोठी कशी दिसेल ह्याचा पाठलाग करणारे आणि दुसरीकडे एखादी गोष्टीचं सूक्ष्मातिसूक्ष्म होत निराकार होत जाणारे. डोळे उघडले की सापडलं असं म्हणायचं आणि डोळे मिटले की रस्ता सापडत नाही म्हणायचं.
निर्विकार होण्याला हल्ली आपण तटस्थता आणि प्रगल्भता समजतो. मन वाणी व्हायला लागली आणि वाणी मन व्हायला लागली की तर्क मांडला जातो. शेवटी काय मन बुद्धी शरीर ह्याचा प्रमेय आपण मांडायचा आपापल्या सोयीप्रमाणे. आम्हाला काय मानसमंदिर पण भावार्थापेक्षा पूजेने जास्त प्रसन्न केलेलं आवडतं.
स्वतःला उलगडून पाहण्याची सवय एकवेळ प्रश्न विचारेल पण ती अंधकार दूर करेल. श्रद्धा पाण्यात डुबकी मारायला लावेल पण भक्ती पोहायला शिकवेल. परिणाम साक्षात्काराचा किंवा चमत्काराचा नसतो तो अधिकधिक स्पष्ट दिसण्याचा असतो. शेवटी पाण्याचे थेंब अंगावर पडणे आणि पावसात भिजणं ह्यात असलेला फरक आपलं आपल्याला उलगडून पहायला शिकवतो. आपण आपल्याशी एकरूप होऊन उरावे.
Comments
Post a Comment