Maharashtra bhoomi ghotala granth

|| महाराष्ट्र भूमी घोटाळा ग्रंथ ||
 प्रथमाध्यायः
भक्त उवाच :-
जय जयाजी काकेश्वरा
सकळ भ्रष्ट आधार
सत्ता उपभोगीशी माघारा
आता विरोधी काय करीशी || १ ||
मागे होतो सत्तेत
धन कमावले घटकेत
झाले घोटाळे अपरिमित
तरीही साव राहिलो त्या काळी || २ ||
आता सत्ता नाही राहिली
केली कमळाबाईनी काहिली
उकरून काढती जुन्या फाइली
पळता भूमी कमी पडे || ३ ||
आधी दादा लटकला
मग छगनही गुरफटला
सुनीलही जलसंधारणे घसरला
आता नाही खैर काही || ४ ||
तुझा फोनशिष्य असे नरेंद्र
त्याचे बोलणे न टाळेल देवेंद्र
फिरवी कळ हाती धरून अमितेंद्र
त्राही त्राही काकेश्वरा || ५ ||
तूची असशी सर्वगामी
सत्तेत विरोधी बडी असामी
तूच करू शकशी कुलंगडी
आता आम्हा तारी काकेश्वरा || ६ ||
ऐशी ऐकता मोहस्थिती नेत्रोन्मीलन करी पक्षश्रेष्ठी
प्रेमहस्ते कुरवाळी आपल्या लेकुरांते

काकेश्वर उवाच :-
मी असे पावरबाज
माझ्या अंतरी असे राजकाज
संकट नसे मजवर काही आज
पार करीन पैलपार || ७ ||
देशसेवा केली आपण
त्याचेही असे काही मोल जाण
घेतले ते थोडे अधिक आपण
तेथे काय बिघडले || ८ ||
आसो सार्वजनिक बांधकाम
वा असो दिल्लीचे महाराष्ट्र सदन
सधन झाला असे माझा छगन
त्यातही माझा हिस्सा असे || ९ ||
आता आली कालगती
नवे सरकार लागले मागुती
जुन्या प्रकरणांच्या कबरी खोदती
दादालाही बोल लागे || १० ||
दादा असे माझा वारस
तोच असे तुमचा तारक
त्याला होणारा त्रास मज मारक
त्यास जपले पाहिजे || ११ ||
तरी दादास वाचवावयासी
छगन तू जा फाशी
तुझी सोय करीन खाशी
त्रास न होईल तुझला फार || १२ ||
तू कमावले धन फार
संसार तुझा होईल पार
पुत्र पुतणे आनंदे जगतील साचार
तुझ्या वाचून काही न आडे || १३ ||

तू जरी जाशील आत
मी होऊ देणार नाही घात
प्रेमे जपेन आपले नातं
आज ना उद्या सोडवीन || १४ ||
सत्ताधारी करती खळखळ
शांत होऊ दे त्यांची चळवळ
दादास करू सुरक्षित सकळ
मग तुझे काय ते बघू || १५ ||
ऐशी ऐकता काकेश्वराची उक्ती
दादुच्या मुखकमळी साठे भक्ती
अत्यानंदे नर्तन करी
काकेश्वरही डोळा घालतसे || १६ ||
इतिश्री महाराष्ट्र भूमि घोटाळा नाम ग्रंथें
सार्वजनिक बांधकाम विभाग नाम प्रथम खंडे
काका पुतण्या मूकसंवादे छगनबळी नाम प्रथमाध्याय संपुर्ण:
शरदाय नमः शरदाय नमः शरदाय नमः

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained