शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका : स्मृती इराणींच्या तडाखेबंद भाषणाने विरोधकांची बोलती बंद

शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका : स्मृती इराणींच्या तडाखेबंद भाषणाने विरोधकांची बोलती बंद
मोदींचे ट्विट सत्यमेव जयते


लहान मुले देशाचे भविष्य आहे. तेव्हा शिक्षणासारख्या पवित्र गोष्टीत राजकारण आणून या क्षेत्राची युद्धभूमी करू नका, अशा शब्दात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. लोकसभेत बुधवारी जेनएनयू व रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी झ्रालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असे कॉंग्रेसने नेमलेल्या कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरूने येऊन सांगावे. आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले. माझे नाव स्मृती इराणी आहे. मी कोणत्या जातीची आहे हे ओळखून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविताना स्मृती इराणी म्हणाल्या, तेलंगणासाठी गेलेल्या आंदोलनामध्ये ६०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. राहुल गांधी तेथे एकदा तरी गेले काय ? नाही ना! पण हेच राहुल गांधी हैदराबाद विद्यापीठात मात्र आवर्जून गेले. कारण रोहितच्या आत्महत्येने त्यांना राजकीय संधी मिळाली. राहुल गांधी उत्तरप्रदेशात जाऊन म्हणतात की देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू रा. स्व. संघाने नेमलेले आहेत. पण, अद्यापही बहुतेक विद्यापीठात कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारने नेमलेले कुलगुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. कॉंग्रेसने नेमलेल्या कुलगुरूंपैकी एकानेही सांगावे की आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले आहे तर मी राजकारण सोडेन, हे माझे आव्हान आहे.
जेएनयू विद्यापीठात जाऊन देशद्रोही नारे देणार्‍या युवकांना पाठिंबा दर्शविणार्‍या राहुल गांधींवर चौफेर टीका करताना स्मृती इराणी म्हणाल्या, केंद्रातील सत्ता इंदिरा गांधी यांनीही गमावली होती. पण, त्यांच्या मुलांनी मात्र कधीही भारतविरोधी नारेबाजीचे समर्थन केले नाही. ज्या ठिकाणी देशविरोधी नारेबाजी झाली त्या कार्यक्रमाचे आयोजन उमर खालिदने केले होते, असेही इराणी यांनी स्पष्ट केले. जेएनयूमधील घटनेची क्लीप सरकारकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांना आपल्या हातातले प्यादे बनवत शिक्षणाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, असे कळकळीचे आवाहन स्मृती इराणी यांनी केले. रोहित वेमुला या विद्याथ्याच्या आत्महत्येच्या मुद्यावर लोकसभेत झालेल्या चर्चेला घणाघाती उत्तर देत स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या आरोपातील हवा आपल्य मुद्देसूद भाषणाने काढून टाकली.
रोहितच्या आत्महत्येने सर्वाधिक वेदना मला झाल्या आहेत. या घटनेनंतर राज्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उत्पन्न होऊ नये म्हणून मी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी केला, पण त्यांनी माझ्याशी बोलण्यासही नकार दिला. रोहितने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच, त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाली असती, तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता, पण या घटनेचे राजकारण करायचे असल्यामुळे त्याच्याजवळ डॉक्टरांना व पोलिसांनाही जाऊ देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप इराणी यांनी केला. रोहित वेमुला दलित नव्हता, असे मी कधीच म्हटले नाही. कारण, कोणताही विद्यार्थी आत्महत्या करतो, त्यावेळी ती सर्वांसाठीच दु:खद घटना असते. त्यामुळे तो कोणत्या जातीचा, या भूमिकेतून त्याच्याकडे पाहिले जाऊ नये, हीच माझी भूमिका होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रोहित वेमुलाला विद्यापीठातून काढण्याचा निर्णय ज्या समितीने घेतला, त्यातील एकाही सदस्याची नियुक्ती आमच्या सरकारने केलेली नव्हती, तर या सर्व सदस्यांची नियुक्ती संपुआ सरकारच्या काळात झाली होती, याकडे लक्ष वेधत, इराणी म्हणाल्या की, रोहितच्या प्रकरणात मंत्री म्हणून मी माझे कर्तव्य बजावले आहे आणि त्यासाठी माफी मागण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या, त्या सर्व तक्रारींचे मी निवारण केले.
तक्रार करणारा कोणत्या जाती-धर्माचा होता, हे पाहिले नाही, असे स्पष्ट करीत इराणी यांनी आतापर्यंत कॉंगे्रस आणि अन्य पक्षांच्या किती खासदारांनी आपल्याकडे विविध प्रकारच्या शिफारसी केल्या आणि आपण त्या कशा मान्य केल्या, याचा पाढा वाचला. आजपर्यंत मी कोणत्याही बाबतीत भेदभाव केला नाही, त्यामुळे माझ्यावर भेदभावाचा आरोप का केला जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित करीत, इराणी म्हणाल्या की, अमेठीत निवडणूक लढण्याची शिक्षा मला दिली जात आहे. मला सुळावर चढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेत आज घणाघाती भाषण करताना इराणी यांचे कधीही न पाहिले आक्रमक रूप सभागृहाने अनुभवले. एका क्षणी त्या विरोधकांवर तुटून पडत होत्या, तर दुसर्‍याच क्षणी अतिशय भावूक होत होत्या. संपूर्ण सभागृहही इराणी यांचे हे रूप पाहून स्तिमित झाले होते.
स्मृती इराणी यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली.
सुळावर चढवण्याचा प्रयत्न
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत बोलताना इराणी म्हणाल्या की, केवळ राजकीय स्वार्थापोटी विरोधी पक्ष मला सुळावर चढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी असून कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्याकडे शिफारसी पाठवल्या आणि मी कर्तव्याचे पालन करण्यासाठी म्हणून त्या शिफारशींची पत्रे पुढे पाठवली.
...तर राजकारण सोडीन
कॉंग्रेसने नियुक्त कलेल्या कोणत्याही कुलगुरूने म्हणावे की, शिक्षणाचे भगवेकरण केले तर मी राजकारण सोडून देईन. त्यांचा हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत उलट कॉंग्रेसलाच त्यांनी आव्हान दिले. इंदिरा गांधी यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, सत्ता तर त्यांनाही सोडावी लागली होती. पण त्यांच्या मुलाने (राजीव गांधी) कधीही देशविरोधी नारेबाजी करणार्‍यांचे समर्थन केले नाही.
ये जमीन का टुकडा नहीं...
आज सोनिया गांधी लोकसभेत नाहीत. त्यामुळे त्यांना मी काही म्हणत नाही, असे बोलत, याच सभागृहात अटलजी म्हणाले होते की, भारत देश हा केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर हा जिवंत राष्ट्रपुरुष आहे. ही वंदन-अभिनंदन करावी अशी भूमी आहे, आम्ही जगू याच भूमीसाठी आणि मरूही भारतमातेसाठी, असे ठामपणे सांगून अटलजींचाही उल्लेख करण्यास स्मृती इराणी विसरल्या नाहीत.
समाजवादी पार्टी सरकारसोबत
जेएनयू प्रकरणी लोकसभेत सरकारला समाजवादी पार्टीची साथ मिळाल्याचे बुधवारी दिसून आले. प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या या विद्यापीठात जे झाले ते अतिशय दुर्भाग्यपूर्ण होते, असे मुलायमसिंह यादव या विषयावर बोलताना म्हणाले. देशविरोधी नारेबाजी करणार्‍यांना माफी न देता अतिशय कडक कारवाई करण्याची मागणीही मुलायमसिंह यांनी यावेळी केली.
कॉंग्रेस पडली एकाकी
जेएनयू प्रकरणी गुरुवारऐवजी बुधवारीच चर्चा करण्याची मागणी कॉंग्रेसने बुधवारी सकाळी केली. अन्य विरोधी पक्षांनी त्याला आधी विरोध दर्शवल्याने कॉंग्रेस एकाकी पडल्याचेही दृष्य पाहावयास मिळाले. मात्र नंतर तृणमूलसह काही पक्षांनी, कॉंग्रेस हा मोठा विरोधी पक्ष असल्याने त्याच्या भावनेची कदर केली पाहिजे, असे म्हणत नंतर कॉंग्रेसच्या सुरात सूर मिसळला.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034