"देशद्रोह्यांना पाठीशी घालणे म्हणजे, देशाच्या एकात्मतेलाच सुरूंग..."

"देशद्रोह्यांना पाठीशी घालणे म्हणजे,
देशाच्या एकात्मतेलाच सुरूंग..."


📌गेल्या दहा दिवसापासून दिल्लीस्थित जेएनयु विद्यापीठात देशद्रोही घोषणा देणाऱ्यांचा अनेक नेत्यांना उमाळा आला आहे. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसचे शहजादे राहुल गांधी तिथे डेरेदाखल झाले. विपश्यना करून आल्यापासून ते अधिक सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच त्यानी संपूर्ण घटना काय आहे हे जाणून घेण्यापूर्वीच "संविधानाने दिलेला  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही." असे वक्तव्य केले.  वास्तवात त्या ठिकाणी "अफलज हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है." "भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी." "पाकिस्थान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद." अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावर राहुल गांधी यांनी केलेले विधान म्हणजे,  "उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग"असेच म्हणावे लागेल. त्यानंतर दुसरे अवतारपुरुष,  "तापलेल्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी" सरसावले ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. हे दोघेही संवैधानिक पदावर असलेले नेते. मात्र केवळ मोदी आणि भाजपा विरोधाने त्यांना पूर्णपणे ग्रासल्याने ते अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचे उघडपणे समर्थन करत सुटले आहेत.
   📌यापूर्वीही राजकारणापोटी अनेकदा काँग्रेसने अल्पसंख्यांक या गोंडस नावाखाली अनेकांचे लांगुलाचन केले आहे. मात्र आता राहुलबाबा त्याहूनही पुढारलेले निघाले. देशद्रोह्याना अशाप्रकारे पाठीशी घालणे म्हणजे देशाच्या एकात्मतेलाच सुरुंग लावण्याचा हा प्रकार आहे. देशद्रोही घोषणा दिल्याच्या आरोपाखाली 'ए.आय.एस.एफ' चा कार्यकर्ता कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर मात्र उठता-बसता संविधानाचा आदर कारणार्यानी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. इथेच खरी गोम आहे.
📌याठिकाणी कन्हैय्या कुमार हा एक प्यादा आहे. ए.आय.एस.एफ. ही डाव्या विचारधारेची विद्यार्थी संघटना आहे. कन्हैय्या हा ए.आय.एस.एफचा कार्यकर्ता असल्यानेच सर्व डावे आणि कथित सेक्युलर फोर्सेस त्याच्या बचावासाठी सरसावले. कारण कन्हैय्या यात दोषी सापडल्यास आपले बिंग फुटेल आणि एबीवीपीसह तमाम उजव्या संघटनांना आपल्याविरोधात प्रचार करण्यास बळ मिळेल. केवळ या एकाच भीतीने ही सर्व मंडळी भेदरली. त्यामुळे कथित विवेकवादी आपला विवेक हरवून बसले. आपण देशविरोधी घोषणाबाजी कारानार्यांना पाठीशी घालतोय याचे भानही त्यांना राहिले नाही.
   📌डावी मंडळी नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन करत असतात. मात्र आता ते अशा युवकांच्या पाठीशी राहून नक्की कोणता संदेश देत आहेत? याच प्रकरणात देशातील डाव्या मंडळीनी जेएनयु प्रकरणातील दोषींचे समर्थन सुरू केले आहे. त्यानी आता नवाच युक्तीवाद मांडायला सुरुवात केली आहे. तो म्हणजे, कन्हैय्याचे समर्थन करणारे देशद्रोही असतील तर मग नथुराम गोडसेचे समर्थन करणारे, त्याचे पुतळे बसवणारे देशद्रोही नव्हेत का? मुळातच माध्यमांना हाताशी धरून सामान्य जनतेत भ्रम निर्माण करणे ही डाव्यांची सुरूवातीपासूनची पद्धत. त्यानुसार यावेळी त्यांनी तोच मार्ग अवलंबला आहे. सारासार विवेकी विचार केल्यास हे लक्षात येईल की, नथुराम गोडसेनी जे केले त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. याउपर महात्मा गांधी हे एक व्यक्ती होते. त्यामुळे नथुरामने खून केला की देशद्रोह केला हा वादाचा एक वेगळा विषय आहे. कोणतीही व्यक्ती राष्ट्रापेक्षा मोठी नसते. त्यामुळे देशविरोधी घोषणा देणे आणि एखाद्या व्यक्तीचा खून करणे यात निश्चितच फरक आहे. इथे नाथूरामाने केलेल्या कृतीचे समर्थन नसून डाव्यांनी चालविलेली दिशाभूल दाखवणे क्रमप्राप्त आहे.
 📌 कॉंग्रेसची डूबती नैय्या वाचविण्यासाठी राहुलबाबा आणि आपली राजकीय वलय वाढविण्यासाठी केजरीवाल आणखी कोणत्या थराला जाणार आहेत कोण जाणे? विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोदी सरकारच्या कामांना झाकोळून टाकण्यासाठीचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न निश्चितच येतो.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034