कवितेच्या प्रांगणातला शुक्रतारा हरपला
-----------------------------------------------------------------------------
पद्मभूषण मंगेश पाडगांवकर यांच्या निधनाने जीवनावर मनापासून प्रेम करणारा उत्तम माणूस जसा आज आपल्यातून दूर गेला आहे तसाच कवितेच्या प्रांगणातील शुक्रतारा ही आज हरपला आहे.
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे” असं म्हणत पाडगांवकरांनी सकारात्मक जीवनाला साद घातली परंतू “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेऊन जाती” असं सांगत जीवनाचे सार ही अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितले.मराठी साहित्यविश्वाला त्यांच्या लेखणीनं आणखी समृद्ध केलं. तरूणाईला त्यांच्या शब्दांचं विलक्षण आकर्षण होतं हे त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येतं. “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ” असं म्हणत त्यांनी आपल्या शब्दांमधून दोन पिढ्यांमधील दरी सांधण्याचं काम केलं होतं.भावगीतं, बालगीतं, निसर्ग कविता यासारख्या कवितांबरोबरच त्यांची जीवनावर चिंतन करायला लावणारी गाणीही विलक्षण होती. कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधीशी काशी” हे गाणं त्याचं एक उदाहरणच आहे.त्यांची गाणी कधी जुनी आणि दु:खी वाटली नाहीत. त्यांची कविता म्हणजे एक प्रकारे आनंदाचे झाडंच होती. एकापेक्षा एक अवीट गोडीची गाणी एकूनच मोठी झालेली आमची पिढी त्यांना आणि त्यांच्या कवितांना कधीच विसरू शकणार नाही.
ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते. त्यांना सलाम काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्कार ही मिळाला होता. त्यांनी २०१० मध्ये झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.
“अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चूका असतील केल्या, केली पण प्रीती... असं म्हणत जीवनावर, जगण्यावर, माणसांवर आणि स्वत:च्या कवितेवर प्रीती करणारा एक सच्चा कवी आज आपल्यातून गेला आहे. ही साहित्य विश्वाची आणि सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे असं मला वाटतं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Comments
Post a Comment