#Harit kranti..
दुसरी हरित क्रांती ?
-----------------------
१)शेताच्या बांधांवर आंबा, चिंच, जांभूळ...
२)विहिरींभोवती रामफळ, बेल, पिंपळ...
३)ओढ्यांच्या काठांवर उंबर, गोंदण, भोकर...
४)माळरान-गायरानात आवळा, बोर, बाभूळ...
५)एकदोन नगदी पिकं, ज्वारी-बाजरी-पिवळी यांच्याबरोबर तेलबिया-डाळी आणि इतर अनेक वरकड धानांनी युक्त हिरवीगार शेतं...
६)मानवप्राणी, पाळीवप्राणी आणि निसर्गातील इतर सर्व प्राण्यांना जे जे हवं ते ते सारं उपलब्ध.
७)स्वप्नवत वाटावं असं हे वर्णन आहे साठ-एक वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण खेड्यांचं.
८)प्रत्येक शेतक-याच्या घरी किमान दहा-पंधरा प्रकारची अन्नधान्ये कमी अधिक प्रमाणात वर्षभर उपलब्ध असायची.
९)उतरंडीच्या डे-यांत गुळ, पाक असायचा.
पैसा फारसा कुणाकडे नसायचा.
सारा व्यवहार धान्याच्या देवाणघेवाणीतूनच चालायचा.
नगदी पीक म्हणून पस-या भूईमुग पुढे आल्यानंतर कापसाची खांदेश मराठवाड्यातून पीछेहाट झाली.
१0)श्रावणी पोळ्याला चार पैसे हातात यावेत म्हणून उडीद-मुगाचे पीकही ब-यापैकी घेतले जायचे.
११)भूईमुगाचे पीक एवढ़या मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे की, मजुरांच्या घरातही पोतं-दोनपोती शेंगा वर्षभर असायच्या. प्रत्येक कालवणात शेंगदाण्याचे कुट आणि जेवताना टोपलंभर भाजलेल्या शेंगा, ही मराठी पंक्तींची खासीयत ! अर्थात त्यावेळची !
१२)कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकी ज्वारी आणि इतर धान्य; जनावरांसाठी पेंड-कडबा . कुटुंबाला वर्षातून दोनदा नवीन कापडं घेता यावीत ही मराठी शेतक-याची माफक अपेक्षा असायची. म्हणूनच कदाचित आम्ही आजच्यापेक्षा त्यावेळी अधिक सुखी, समाधानी होतो.
१३)१९७२ च्या भीषण दुष्काळाने महाराष्ट्राचे होत्याचे नव्हते करुन टाकले.
१४)पश्चिमेकडून आलेल्या वा-यांमुळे गावं आणि शिवारंही बदलू लागली. खाण्यापिण्याच्या आणि पीकपाण्याच्या सवयी बदलू लागल्या. अधिक उत्पादन देणा-या संकरीत ज्वारीने पस-या भूईमुग हळूहळू हद्दपार केला.
१५)प्रथमच गावरान ज्वारीच्या लागवडी खालील क्षेत्र झपाट्याने आक्रसू लागले. संकरीत ज्वारीच्या भाकरीने भूक भागायची नाही आणि तिच्या कडब्याला जनावरं तोंड लावायची नाहीत. घरी पोटभर भाकरी खाऊन शेतात जाईपर्यंत परत भूक लागायची.
१६)गोधन-पशूधन कमी होऊ लागले. स्वत: तयार केलेले गावरान बी-बियाणे आणि शेणखत वापरणारा बळीराजा संकरीत बी-बियाने आणि रासायनिक खतांसाठी लाचार, परावलंबी होत गेला.
१७)एकदा संकरीत तुरीच्या बियाणाने तर कमालच केली. तुरी पुरुषभर उंच वाढल्या परंतु त्याला शेंगा आल्याच नाहीत.
१८)गावरान तुर, अंबाडी, जवस, तीळ, वरई, भगर, करडई तर गायबच झाले.
१९)कपडे आणि दोरखंडही नायलॉनचेच.
२०)साखर कारखानदारी जसजशी वाढत गेली तसतसे अफाट पाणी पिणारा ऊस हातपाय पसरु लागला.
२१)परिसराला आणि अनेक लोकांच्या तोंडाला मळीची दुर्गंधी येऊ लागली. प्रतिष्ठेच्या, मोठेपणाच्या कल्पना बदलू लागल्या.
२२)संकरीत ज्वारी, जिला गावरान भाषेत ‘हायब्रीड’ म्हटले जायचे, जितक्या वेगात आली तितक्याच वेगात निघून गेली परंतु ती माणसांना आणि जनावरांना अशक्त करुन गेली.
२३)त्यानंतर सोयाबीन आले. त्याच्याबरोबर अनुदानही आले. जिकडे तिकडे सोयाबीन दिसू लागले. गावरान ज्वारी-बाजरी-पिवळी आधीच गायब झाली होती. आमटी-भाकरीची जागा पोळी-भाजीने घेतली. त्यासाठी गहु-तांदुळ परप्रांतांतून येऊ लागला.
२४)दहा-पंधरा प्रकारची पिके घेणा-या शेतक-याची शेती एकसुरी होऊ लागली. सोयाबीनचा स्थानिक पातळीवर खाद्य म्हणून उपयोग करता येत नाही.
२५)यापूर्वी घरात चार पोती ज्वारी असली की अडीअडचणीला त्याच्या कण्या करुन खाता येत असत. ज्वारीच्या जाण्याने तो आधार गेला. जमिनीच्या आणि तिच्या लेकरांच्या आहारातील सत्व आणि विविधता कमी होत गेली. रासायनिक खतांच्या सततच्या मा-यांमुळे मातीची जैविक संरचना बिघडली. शेणखताच्या अभावामुळे मातीची पाणी धारण क्षमता कमी होत गेली. एकसुरी पीक पद्धतीमुळे एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं किंवा अती उत्पादन झाल्यामुळे त्याचे बाजारभाव गडगडण्याचं प्रमाण वाढलं. साखर मुबलक पण तुरडाळ गायब, हे आजचे ज्वलंत उदाहरण आहे.
२६)यामुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे शेतकरी आत्महत्त्या करु लागला. मिळणा-या मदत, सवलतींसाठी शेतकरी आत्मसन्मान, आत्मविश्वास गमावून बसला. भाकड जनावरांबरोबरच म्हातारे आईबापही त्याला नकोसे वाटू लागले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर राजकारणाची अनिष्ट छाप पडू लागली. व्यसनं, मारामा-या, हेवेदावे यांनी सारा गाव पोखरुन काढला. शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. लहरी निसर्ग आणि चतुर बाजारव्यवस्था यांच्या कात्रीत सापडलेला शेती व्यवसाय आतबट्ट्याचा व्यवहार ठरु लागला.
२७)शेतकरी काळी आई विकू लागला आणि राजकारणी, व्यापारी ती घेऊ लागले. शहरांकडे पलायन वाढलं. शेतमजूर मिळेणासे झाले.
२८)शेतक-यांविषयी इतरांना आत्मियता वाटेनाशी झाली.
२९)हॉटेलच्या वेटरला १०० रुपये टीप देणा-याला १० रुपये किलो कांदा महाग वाटू लागला.
३०)असो. झाडे गेली, ओढे कोरडे पडले, वन्यजीव परागंदा झाले. चिमण्यांच्या चिवचिवटाऐवजी डॉल्बीचा दणदणाट, राजकारण्यांची कावकाव आणि सा-यांचीच खावखाव !
३१)शेती भकास, शेतकरी उदास आणि इतर सारे बिनधास्त ! अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी दुस-या हरितक्रांतीची हाक दिली आहे.
३२)कुणासाठी आणि कशी असेल ही दुसरी हरित क्रांती ?
३३)शेतक-यांची पोरं शेतात जायला तयार नाहीत. दिवसभर पुढा-याच्या अवतीभवती फिरतात, ढाब्यावर जेवन करतात आणि मुक्कामाच्या गाडीने रात्री उशीरा घरी परततात.
३४)दुसरी हरित क्रांती कुणाच्या भरवशावर करणार ?
३५)कोण करणार ?
भ्रष्ट नोकरशाही ?
दिशाहीन शिक्षणप्रणाली ?
भरकटलेली प्रसारमाध्यमे ?
निद्रिस्त समाज ?...
३६)प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वर्षी ठराविक कालावधीचे लष्करी आणि शेतकी प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. बेशिस्त आणि मातीशी नाळ तोडलेला समाज कुठलीही क्रांती करु शकत नाही.
३७)विचार करा... आणि भानवर येऊन कृती करण्यासाठी
कंबर कसा.
Comments
Post a Comment