मालमत्ता करप्रणाली हाणून पाडणार!

मालमत्ता करप्रणाली हाणून पाडणार!




मालमत्ता कराच्या नव्या प्रणालीसाठी स्वयंमूल्य निर्धारणाचे अर्ज भरण्यासाठी ठाणेकरांकडून थंड प्रतिसाद मिळत असताना ही करप्रणाली हाणून पाडायची असा निर्धारच शनिवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात झालेल्या एका चर्चासत्रात ठाण्यातील मान्यवरांनी केला . निमूटपणे कर भरणाऱ्यांवरच जादा कराचा बोजा पडणार असेल तर त्याविरोधात हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णयही यावेळी झाला . या पवित्र्यामुळे नव्या करप्रणालीचे भवितव्य अंधारात सापडले आहे .



भांडवली मूल्यावर आधारित नव्या करप्रणालीच्या विषयावर ठाणे डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी चर्चासत्राचे आयोजन केले होते . पत्रकार मिलिंद बल्लाळ , अॅड प्रशांत पंचाक्षरी , कर सल्लागार संजय अंबार्डेकर आणि आर्किटेक्ट उल्हास प्रधान , पालिकेचे माहिती व जनसपर्क अधिकारी संदीप माळवी , प्रभारी कर निर्धारक वर्षा दीक्षित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .



या कराचा दर ( टॅक्स रेट ) अद्याप ठरलेला नाही . महासभेत त्याचा निर्णय होणार आहे . नवी कर प्रणाली लागू झाल्यावर कोणत्या भागात नेमका किती कर वाढणार याची ठोस माहिती पालिका अधिकाऱ्यांना देता न आल्याने गोंधळ उडाला . काहींनी ्रश्न विचारण्यासाठी थेट स्टेजवर धाव घेतली . त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी कर प्रणालीचे सादरीकरण थांबवले . सिताराम राणे यांच्या प्रेझेंटेशननंतर करात किती वाढ होऊ शकते याचा थोडा अंदाज लोकांना आला .



जोपर्यंत या कर प्रणालीला पालिकेची महासभा मंजुरी देत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही , असे अॅड प्रशांत पंचाक्षरी यांनी ठासून सांगितले . त्यामुळे ही कर प्रणाली फेटाळली जावी यासाठी विधायक पद्धतीने नगरसेवकांवर दबाव आणावा लागेल असे ते म्हणाले . करदात्यांनी चुकीची माहिती दिल्यास थेट १० पट दंड आकारण्याची तरतूद कोणत्या कायद्यात आहे , असा सवालही त्यांनी केला . त्यांच्या प्रश्नाचे पालिका अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत . अनेक इमारती अधिकृत आहेत की अनधिकृत याचे रेकॉर्डच पालिकेकडे उपलब्ध नसल्याने त्यावर कर आकारणी कशी करणार असा सवालही त्यांनी केला . स्वयंमूल्यनिर्धारणाच्या फॉर्ममध्ये अनेक चुका असल्याचे उल्हास प्रधान यांनी दाखवून दिले . पालिकेने चांगल्या सुविधा दिल्यास करवाढीस कुणी विरोध करणार नाही असेही त्यांनी सांगितले . करवाढ होणारच असेल तर ती माफक असावी असे मत कर सल्लागार संजय अंबार्डेकर यांनी व्यक्त केले . किती करवाढ होईल याची माहिती पालिका जाणीवपूर्वक लपवत असल्याचा आरोप रवींद्र कर्वे यांनी यावेळी केला .

ज्याप्रमाणे शेअर विकले जात नाहीत तोपर्यंत त्यावर कर लागत नाही , त्याच धर्तीवर केवळ कागदावर अव्वाच्या सव्वा वाढलेल्या घराच्या किमतींवर कर कसा आकारता येईल असा सवाल कर्वे यांनी यावेळी केला . दरम्यान सर्व तज्ञांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर अध्यक्षीय भाषणात मिलिंद बल्लाळ यांनी कोणतीही नवी पद्धत लागू करण्याआधी लोकांना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली . दरम्यान या कर प्रणालीला सर्वच थरातून प्रखर विरोध असल्याने तसा ठराव लवकरच फेडरेशनच्या माध्यमातून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला .

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034